राज्यभरात करोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात! मुंबई, पिंपरी-चिंचवडसह इतर ठिकाणीही संसर्गात मोठी वाढ

पुणे : राज्यातील करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या २४ तासांत ६५ रुग्ण आढळले आहेत. त्यात पुण्यात सर्वाधिक २५ रुग्ण असून, त्याखालोखाल मुंबईत २२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात या वर्षातील करोनाची एकूण रुग्णसंख्या ८१४ वर पोहोचली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ६५ रुग्ण आढळले. त्यात पुणे महापालिका २५, मुंबई २२, ठाणे महापालिका ९, पिंपरी-चिंचवड महापालिका ६, कोल्हापूर महापालिका २ आणि नागपूर महापालिका १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात १ जानेवारी ते १ जूनपर्यंत ११ हजार ५०१ संशयित करोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८१४ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक ४६३ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील करोनाची सक्रिय रुग्णसंख्या ५०६ असून, ३०० रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत करोनाच्या ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील सात रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. त्यातील एका रुग्णास मूत्रपिंडविकारासह चेताविकार होता, तर दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक आला होता आणि त्याला अपस्माराचा आजार होता. चौथ्या रुग्णास गंभीर स्वरूपाचा मधुमेहाचा आजार होता. पाचव्या रुग्णास फुफ्फुसाचा आजार होता. सहाव्या रुग्णास मधुमेहासह अर्धांगवायू झाला होता. सातव्या रुग्णास गंभीर स्वरूपाचा श्वसनविकार होता तर आठव्या रुग्णास ताप आणि धाप लागणे अशी लक्षणे होती, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – राज ठाकरेंना धक्का? मोठा नेता पक्षावर नाराज, एका पोस्टमुळं चर्चेला उधाण
राज्यातील करोना संसर्ग (१ जानेवारी ते १ जून)
करोना चाचण्या – ११ हजार ५०१
एकूण रुग्ण – ८१
मुंबईतील रुग्ण – ४६३
सक्रिय रुग्ण – ५०६
बरे झालेले रुग्ण – ३००
रुग्ण मृत्यू – ८
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
राज्यात करोना रुग्णांमध्ये तुरळक वाढ दिसून येत आहे. यामुळे श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांची करोना चाचणी केली जात आहे. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत असल्याने नागरिकांनी घाबरू नये.
–डॉ. बबिता कमलापूरकर, सहसंचालिका, आरोग्य विभाग