स्थानिक स्वराज्य संस्थाचे बिगुल लवकरच वाजणार; राज्य निवडणुक आयोगाच्या सरकारला महत्वाच्या सुचना

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणुक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचनेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर आक्टोंबरमध्ये निवडणुका जाहीर होणार असं सांगितले होते.
राज्य निवडणुक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आनुषंगाने तयारीला सुरुवात देखील केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधीत सूचना करण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपवली आहे. प्रभाग रचनेची माहिती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी देशाची दिशाभूल केलीय का? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!
महाविकास आघाडीच्या काळात प्रभाग रचनेचा अधिकार सरकारने स्वतःकडे घेतले होते. आता प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्पष्ट आदेश देत, राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची ४ महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याआधी चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करावी, असे निर्देश दिले होते.