नारायण राणेंना संजय राऊतांची कायदेशीर नोटीस; म्हणाले,..माफी मागावी

बदनामीकारक, दुर्भावनापूर्ण आणि खोटी टिप्पणी केल्याबद्दल राणेंना मानहानीची नोटीस
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नारायण राणे हे पाठमागील काही दिवसांपासून शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर तिव्र शब्दात निशाणा साधत आहेत. राणे यांनी संजय राऊत यांच्यावर वेळोवेळी अनेक आरोप केले आहेत. या आरोपावरून संजय राऊत यांनी नारायण राणेंना नोटीस पाठवली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी, नारायण राणे सार्वजनिक मंचावरून तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेने बाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात. हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी. माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे. कर नाही तर डर कशाला? जय महाराष्ट्र!, असं म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी 15 जानेवारी 2023 रोजी भांडुप येथे आयोजित कोकण महोत्सवात त्यांच्याबद्दल बदनामीकारक, दुर्भावनापूर्ण आणि खोटी टिप्पणी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे, असं संजय राऊत यांचे वकील अॅड सार्थक शेट्टी यांनी म्हटलं आहे.





