मुंबई,नवी मुंबईत एकाच दिवशी दहा ठिकाणी फेरीवाल्यांचा लक्षणीय मोर्चा
कामगार विश्व: महापालिका क्षेत्रामध्ये पथ विक्रेता कायद्याचे अंमलबजावणी व्हावी

पिंपरी-चिंचवड : मुंबई व नवी मुंबई परिसर उपनगरातील सर्व महापालिका क्षेत्रामध्ये पथ विक्रेता कायद्याचे अंमलबजावणी व्हावी , कारवाई थांबवावी या मागणीसाठी मुंबई आणि इतर परिसरातील पथ फेरीवाल्यांनी वेगवेगळ्या महापालिका आणि नगरपालिका कार्यालयावर एकाच दिवशी दहा ठिकाणी तीव्र लक्षणीय मोर्चे काढण्यात आले. यावेळी विविध आयुक्त ,अधिकारी, कर्मचारी यांच्याशी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, कामगार एकता युनियन,शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आयटक सह विविध संघटनांनी या मोर्चाचे आयोजन करत यशस्वी केले. यात मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, कोकण विभाग यासह विविध क्षत्रिय कार्यालयावर हे मोर्चे काढण्यात आले. यात पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
हेही वाचा – ‘मुंडेंच्या राजीनाम्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे’; सुप्रिया सुळे यांची मागणी
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, महाराष्ट्र हॉकर फेडरेशनच्या सचिव विनिता बाळेकुंद्री, कोषाध्यक्ष अखिलेश गौड, संयोजक राजेश माने, शारदा देसाई ,कामगार नेते प्रफुल्ल म्हात्रे ,निमंत्रक बाळकृष्ण खोपडे, हुस्ना खान,राम गुप्ता, शहनाज सय्यद, प्रकाश आमटे, धोंडीराम बद्रे आदी उपस्थित होते .
यावेळी नखाते म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये या पथविक्रेता या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून राज्यांमध्ये काही ठिकाणी अंमलबजावणी होत आहे तर काही ठिकाणी कारवाई होत आहे हा दुराभास संपवण्यासाठी राज्य शासनाचे एकच धोरण असणे गरजेचे आहे ते करण्यासाठी आपण शासनाला भाग पाडू आणि मुंबई आणि परिसरातील विक्रेते यांच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात स्वस्त दरात वस्तू उपलब्ध होतात त्यांच्यामुळे नागरिकांचा फायदा होत आहे त्यांच्याकडे सरकार व महापालिकेने दुर्लक्ष करता कामा नये ते केल्यास पुढील कालावधीमध्ये खूप मोठे आंदोलन होईल. विनिता बाळेकुंद्रे यांनी नगर विकास विभागाचे सचिव गोविंदराज यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच सरकारने नगर विकास आराखड्यात फेरीवाल्यांसाठी जागेचे नियोजन करण्यात यावे अन्यथा पुढील कालावधीमध्ये राज्यातील फेरीवाले एकत्र येऊन लढा देतील.