मुंबई हल्ल्याचा खतरनाक दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी
पाकिस्तानी वंशाचा कॅनडाई बिझनेसमन तहव्वुर राणाने 2008 सालच्या मुंबई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली

अमेरिका : मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 हल्ल्याच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वुर राणा या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. त्याला न्यायाचा सामना करावा लागेल असं ट्रम्प म्हणाले. मागच्या महिन्यात तहव्वुर राणाच भारताला प्रत्यर्पण करण्यास अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती. पाकिस्तानी वंशाचा कॅनडाई बिझनेसमन तहव्वुर राणाने 2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे.
भारताने अमेरिकी एजन्सीसोबत डिटेल्स शेअर केली होती. तिथल्या सत्र न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात या गोष्टी मांडण्यात आल्या. भारताने दिलेले पुरावे अमेरिकी कोर्टाने मान्य केले. भारताने दिलेल्या कागदपत्रात 26/11 हल्ल्यात तहव्वुर राणाच्या भूमिकेची माहिती दिली होती.
हेही वाचा : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मिळाला नवा कर्णधार, जाणून घ्या RCB चा संपूर्ण संघ
कोण आहे तहव्वुर राणा?
मुंबई पोलिसांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यासंबंधी आपल्या आरोपपत्रात तहव्वुर राणाच्या नावाचा समावेश केला होता. त्याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI आणि दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा सक्रीय सदस्य म्हणून काम केल्याचा आरोप आहे. चार्जशीटमध्ये राणावर आरोप आहे की, त्याने 26/11 दहशतवादी हल्ल्यााचा मास्टरमाइंड डेविड कोलमॅन हेडलीची मदत केली. मुंबईत कुठे-कुठे हल्ले करायचे, त्या जागांची रेकी तहव्वुर राणाने केली होती. प्लान बनवून पाकिस्तानी दहशतवाद्यांना सोपवला होता.
डेविड कोलमॅन हेडली कोण?
तहव्वुर राणा आणि डेविड कोलमॅन हेडली उर्फ दाउद सईद गिलानी बालपणीचे मित्र आहेत. हेडली एक अमेरिकी नागरिक आहे. त्याची आई अमेरिकी आणि वडिल पाकिस्तानी होते. अमेरिकी अधिकाऱ्यांनी ऑक्टोंबर 2009 मध्ये शिकागोमधून हेडलीला अटक केली होती. अमेरिकी कोर्टाने 24 जानेवारी 2013 रोजी हेडलीला मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्या प्रकरणी दोषी ठरवून 35 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. तहव्वुर राणाने पाकिस्तानच्या हसन अब्दाल कॅडेट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. हेडलीने सुद्धा अमेरिकेत शिफ्ट होण्याच्या पाच वर्ष आधी तिथे शिक्षण घेतले होते.