शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत द्या, अन्यथा उडवून देऊ; काँग्रेस खासदाराचा मोदी–फडणवीस सरकारला इशारा

Prashant Padole | भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची मदत द्यावी, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ असा धमकीवजा इशारा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
खासदार प्रशांत पडोळे म्हणाले की, शेतकरी विषयक धोरण केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने बदलावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्यावी. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला परतीच्या पावसानं अक्षरश: झोडपून काढल्यानंतर धान पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. शेतातील धानाला कोंब फुटलेली आहेत. सरकारनं धोरण बदलायला पाहिजे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे फक्त 18 रुपये मिळतात, ही शोकांतिका आहे. त्यामुळं शेतकरी विषयक धोरण बदलली पाहिजे.
हेही वाचा : अनिल अंबानींची ३,००० कोटींची मालमत्ता जप्त; ‘ईडी’ची मोठी कारवाई
दरम्यान, अलीकडेच बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केलं होतं, त्यानंतर सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केली. मात्र, पडोळेंनी आता थेट केंद्र आणि राज्य नेतृत्वालाच इशारा देत आंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटवली आहे.




