अनिल अंबानींची ३,००० कोटींची मालमत्ता जप्त; ‘ईडी’ची मोठी कारवाई

Anil Ambani | आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी, त्यांच्या कंपन्या आणि संबंधित संस्थांशी निगडित तब्बल ३,०८४ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती आणण्यात आली आहे.
ईडीने ३१ ऑक्टोबर रोजी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) चार तात्पुरते जप्ती आदेश जारी केले. यात अनिल अंबानी यांचा मुंबईतील पाली हिल येथील बंगला, तसेच समूहाशी संबंधित इतर निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.
जप्तीच्या यादीत दिल्लीतील महाराजा रणजीत सिंह मार्गावरील रिलायन्स सेंटरची जमीन, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या विविध मालमत्ता, तसेच मुंबई, पुणे, ठाणे, नोएडा, गाझियाबाद, हैदराबाद, चेन्नई आणि पूर्व गोदावरी येथील इतर संपत्तींचा समावेश आहे.
हेही वाचा : बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईतील नगिन महल इमारतीतील कार्यालये, नोएडातील बीएचए मिलेनियम अपार्टमेंटमधील सदनिका, आणि हैदराबादमधील कॅमस कॅप्री अपार्टमेंट्स या मालमत्तादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईवर अद्याप अंबानी किंवा त्यांच्या समूहाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
प्रकरण नेमके काय?
ही चौकशी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) या कंपन्यांनी केलेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे. २०१७ ते २०१९ दरम्यान YES बँकेने RHFL मध्ये २,९६५ कोटी रुपये आणि RCFL मध्ये २,०४५ कोटी रुपये अपरिवर्तनीय रोख्यांच्या स्वरूपात गुंतवले होते. मात्र २०१९ च्या अखेरीस ही गुंतवणूक थकबाकी (NPA) झाली.
ईडीच्या माहितीनुसार, RHFL ने १३५३.५० कोटी रुपये, तर RCFL ने १९८४ कोटी रुपये थकविले. या रकमांचा गैरवापर आणि निधी अन्यत्र वळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी ऑगस्टमध्ये सुरू झाली, तर २४ जुलै रोजी मुंबईत ५० कंपन्यांच्या ३५ ठिकाणी आणि २५ अधिकाऱ्यांवर झडती घेण्यात आली होती. एकूण १७,००० कोटी रुपयांहून अधिक कर्जरकमेचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.




