नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात बॉम्बची अफवा
पोलिसांनी सनदी लेखापालाला ताब्यात घेतले

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सोमवारी सव्वा चार वाजताच्या सुमारास बॉम्ब ठेवल्याच्या फोन आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. बॉम्ब शोध व नाशक पथकाने परिसरात तपासणी केल्यावर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. याप्रकरणी पोलिसांनी सनदी लेखापालाला ताब्यात घेतले.
प्रकाश वासवानी (वय ५०, रा. जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००४ साली अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या त्याच्या बहिणीला जाळून मारल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. २०११ मध्ये उच्च न्यायालयात खटल्याच्या सुनावणीत सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर प्रकाश सातत्याने न्यायालयात अर्ज दाखल करीत होता.
हेही वाचा – ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास त्यांनी ११२ क्रमांकावर मोबाइलने फोन करून उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सदर पोलिस आणि बॉम्ब शोध व नाशक पथकाने तत्काळ उच्च न्यायालय परिसर गाठून तपासणी केली.
मात्र ती अफवाच ठरली. दरम्यान मोबाइल क्रमांकावरून पोलिसांनी वासवानी यांना ताब्यात घेतले. त्यांना सूचना पत्र देऊन सोडून दिले. दरम्यान या अफवेमुळे परिसरात घबराट पसरली होती.