‘तुम्ही देव आहात की नाही हे लोकांना ठरवू द्या’; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
Mohan Bhagwat | देवाने मला काही विशिष्ट उद्धिष्टासाठी पाठवले आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत मी काम करत राहीन, असं विधान लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केले होते. त्या पार्श्वभूमीवर, मी देव आहे, अशी भावनाही काही जणांना जाणवत आहे. मात्र, तुमच्यातील देवत्व लोकांनी ठरवावे. माझ्याबाबत कोणी असे शब्द उच्चारले, तर मी ते कानापर्यंत येऊ देतो. पण, ते मनापर्यंत पोहोचू देत नाही, असं भागवत यांनी म्हटल्याने त्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मोहन भागवत म्हणाले, देशभक्ती, विविधता ही देशाची बलस्थाने आहेत. देशभक्ती अधूनमधून झोपी जाते. मात्र, चटका बसला, की ती जागृत होते. देश म्हणून आपण एक आहोत, ही भावना महत्वाची आहे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. महापुरूषांकडे प्रेरणा घेऊन खारीचा वाटा उचलणारे कार्यकर्ते हवे आहेत. अखंडित कार्य करताना ते पणतीसारखे असले पाहिजे. वीज चमकून गेल्यानंतर काही काळ अंधार होतो. पणती मात्र तेवत रहाते. चमकून डोक्यात जाण्यापेक्षा पणती म्हणून तेवत राहावे लागणार आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाले..
देशभक्ती, संस्कृती आणि बलिदान ही भारतीयांना जोडणारी त्रिसूत्री आहे. मात्र, अजूनही देशाला उर्जितावस्था यायला वेळ आहे. पुढील एक-दोन पिढ्या यासाठी कार्य करावे लागेल. मात्र या उर्जितावस्था, उन्नती काही शक्तींना नको आहे. देशाचा उत्कर्ष ज्यांना नको आहे, अशा शक्ती सर्व काही ओरबडण्याचा प्रयत्न करत आहेत, असं भागवत म्हणाले.
मणिपूरमधील कठीण परिस्थितीतही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक कणखरपणे उभे आहेत. संताप, क्रोध, द्वेष विसरून नागरिकांतील संघर्ष थांबावा म्हणून सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. गेली ४० ते ५० वर्षे समर्पित वृत्तीने कार्य करणारे संघ स्वयंसेवक आणि इतर संघटनांमुळेच पूर्वांचलाची स्थिती आज सुधारत आहे. मणिपूरमधील द्वेषाची आग भडकू न देता शांत करता आली पाहिजे. ही परिस्थिती कशी बदलवता येईल, याचा कृतीशील विचार आवश्यक आहे, असे डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.