पिंपरी-चिंचवडची वाटचाल ‘एज्युकेशन हब’च्या दिशेने!
भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विश्वास
पिंपरी-चिंचवडकरांशी सोशल मीडियातून संवाद
पिंपरी : राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या मदतीने आणि महानगरपालिका प्रशासनाच्या सकारात्मक सहकार्यामुळे गेल्या १० वर्षांमध्ये शहरातील शिक्षण क्षेत्रात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यामुळे शहराची वाटचाल ‘एज्युकेशन हब’च्या दिशेने सुरू आहे, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
शहरातील शैक्षणिक उपक्रम आणि प्रकल्पांबाबत आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, कामगारनगरी, उद्योगनगरी आणि ऑटो हब, आयटी हब… अशी दमदार वाटचाल करणारे आपले पिंपरी-चिंचवड शहर… देशाच्या कानाकोपऱ्यातून नोकरी, शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने या शहरात नागरिक वास्तव्य करीत आहेत… म्हणूनच या शहराला ‘मिनी इंडिया’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, आधुनिक शिक्षणासाठी मुंबई, पुणे यासह राज्याबाहेरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे दर्जेदार शैक्षणिक सुविधा शहरात निर्माण व्हाव्यात, असा संकल्प आम्ही केला आहे.
शहरात भारतीय संत परंपरा, महाराष्ट्राचा गौरवशाली वारकरी सांप्रदायाचा वारसा जोपासला जावा…आधुनिक शिक्षणाशी स्पर्धा करतानाच अध्यात्माचाही प्रचार-प्रसार व्हावा या संकल्पनेतून आपण जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आपल्या टाळगाव चिखली येथे सुरू झाले आहे. आजच्या घडीला या शैक्षणिक संकुलामध्ये १ हजार २०० हून अधिक विद्यार्थी वारकरी व आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत…. मला सांगायला अभिमान वाटतो की, हे भारतातील पहिले संतपीठ आहे. तसेच, राज्यातील नामांकीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची शाखा आपल्या मोशीमध्ये उभारली जात आहे. पिंपरी-चिंचवड मेडिकल कॉलेज व संशोधन सेंटर व पॅरामेडिकल कॉलेजसुद्धा सुरू होत आहे. विशेष म्हणजे, स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून शहरातील महानगरपालिकेच्या शाळा ‘स्मार्ट स्कूल’ संकल्पनेतून अध्ययावत करण्यात येत आहेत. तारांगण प्रकल्पामुळे विज्ञान क्षेत्रात मुलांची गोडी वाढती आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
संविधान भवनाचा अभिमान…
भारतीय लोकशाही… संविधान… राज्यघटना याचा प्रचार-प्रसार आणि जागृती व्हावी. यासह जगभरातील लोकशाही देशांमधील राज्यघटनांचा अभ्यास व्हावा. या करिता आपण भारतातील पहिले ‘‘संविधान भवन’’ उभारत आहोत. हा शहराच्या शैक्षणिक कामगिरीमधील मानाचा तुरा राहणार आहे आणि विशेष म्हणजे, सदर संविधान भवन व शहरातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी आपल्या मोशीत साकारते आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो, असेही आमदार लांडगे म्हणाले आहेत.
आयआयएम शिक्षण क्षेत्रातील ‘माईलस्टोन’…
आगामी काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षण उपलब्ध व्हावे. या करिता आयआयएम अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची शाखा आपल्या भोसरी मतदार संघात होते आहे. कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकारच्या पुढाकाराने आपण राष्ट्रीय कला अकादमी उभारण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. यासह इंटरनॅशनल स्कील डेव्हलपमेंट सेंटर, सी-डॅक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असे विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, हे सर्व प्रकल्प शहराच्या शैक्षणिक क्षेत्राला नव्या उंचीवर नेतील, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.
शिक्षण क्षेत्रात केवळ नवीन प्रकल्पांना ‘रेड कार्पेट’ नव्हे, तर शैक्षणिक संस्थांना शहरात पोषक वातावरण निर्माण व्हावे. या करिता आम्ही पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर दिला. त्यामुळे ‘‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’’ विकसित झाला. नागरीकरण आणि शैक्षणिक गरजा याचा विचार करुन गेल्या १० वर्षांमध्ये एकूण १० नवीन शाळा उभारण्याचे काम हाती घेतले. त्यापैकी कुदळवाडी, चिखली, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, नेहरुनगर येथील काम पूर्ण झाले असून, डुडुळगाव, दिघी, भोसरी येथील शाळांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, खासगी शाळांच्या संख्या २०६ वर पोहोचली आहे. माझ्या विधानसभा क्षेत्रात खासगी व शासकीय असे तब्बल १ लाख २९ हजार ९६० इतके विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा पिंपरी-चिंचवड.