Mission PCMC : पिंपरी-चिंचवडमध्ये निष्ठावंतांशी संवाद साधणार… सर्वेसर्वा शरद पवार!
17 जून रोजी आढावा बैठक : महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार गट आता मैदानात उतरला आहे. पक्षाच्या आगामी रणनितीची आखणी आणि कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी दि.१७ जून २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली. Mission PCMC
सिल्व्हर बॅन्क्वेट हॉल, ताथवडे येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभणार आहे. यासोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचीही उपस्थिती सुनिश्चित करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे आणि राहुल कलाटे यांचे गट आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. गव्हाणे यांचा मुहूर्त ठरला असून, दि. 17 जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत 25 माजी नगरसेवकांची टीम आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसेल, असा दावा केला जातो.
विशेष म्हणजे, दि. 17 जून रोजी दोन्ही राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. सकाळी ताथवडे येथील हॉलमध्ये शरद पवार यांची आढावा बैठक होणार आहे. त्याच दिवशी दुपारी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. एकाच दिवशी राष्ट्रवादीत होणारी ही उलथापालथ शहरातील राजकारणात खळबळ उडवून देणारी ठरणार आहे.
हेही वाचा: Mission PCMC : विधानसभेला फुंकली ‘तुतारी’; महापालिकेला फिरले ‘माघारी’
महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले! Mission PCMC
महापालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, संघटन बळकट करणे आणि स्थानिक पातळीवरील तयारीचा आढावा घेणे हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट आहे. पक्षातील गटबाजी, पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर पक्षाची एकी आणि ताकद दाखवणे हाही या बैठकीमागील उद्देश असल्याचे मानले जात आहे. या बैठकीत वॉर्डनिहाय संघटन, संभाव्य उमेदवार, प्रचार यंत्रणा, आणि सोशल मीडिया आघाडीवर कार्यकर्त्यांना दिशा दिली जणार आहे.
राज्यातील राजकीय उलथापालथ, बदलते समीकरण आणि कार्यकर्त्यांच्या बदलत्या निष्ठा यांच्याशी सामना करताना राष्ट्रवादी शरद गटाने नव्या जोमाने मैदानात उतरण्याची तयारी आहे. ही बैठक म्हणजे केवळ आढावा नाही, तर एक राजकीय निर्धार ठरणार आहे.
– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट.