Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

Mission PCMC : विधानसभेला फुंकली ‘तुतारी’; महापालिकेला फिरले ‘माघारी’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संधीसाधुंना ‘‘रेड कार्पेट’’ : ‘‘Political credibility’’ संपली, ‘वेळ’ पुन्हा बदलली

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातून शरद पवारांची ‘तुतारी’ हातात घेतलेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे आणि टीम पुन्हा ‘घड्याळ’ हातात बांधण्याच्या तयारीत आहे. दि. 17 जून रोजी शहरात उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या समक्ष जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभेला फुंकली ‘तुतारी’ अन्‌ महापालिकेसाठी फिरले ‘माघारी’ असे चित्र पहायला मिळत आहे. ( Mission PCMC )

भारतीय जनता पार्टीतून अजित गव्हाणे यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला. स्थायी समिती अध्यक्षपदापर्यंत कारकीर्द गाजवली. राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि ‘मशाल’ हातात घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी अजित गव्हाणे यांना विश्वासाने शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असलेल्या अजित गव्हाणे यांनी भाजपाविरोधात रान पेटवले होते. किंबहुना, शहरातील सत्ता आपल्या मर्जीप्रमाणे चालवली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांसोबत राहण्यास पसंती दिली. लोकसभेला महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात काम केले. पण, विधानसभा निवडणुकीत तिकीटासाठी थेट अजित पवार यांची साथ सोडली (अजित पवार यांच्या सहमतीनेच प्रवेश केला असे ते सांगतात.) आणि शरद पवार गटात प्रवेश केला.

ज्या गव्हाणे यांनी खासदार कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचे काम केले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्याच डॉ. कोल्हे यांनी गव्हाणे यांच्यासाठी तिकीटाचा आग्रह धरला होता. गव्हाणे यांनी महाविकास आघाडीतून ‘तुतारी’च्या चिन्हावर लढण्याच्या दृष्टीने शरद पवार गटात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर अवघ्या 8 महिन्यांत गव्हाणे आणि सहकारी पुन्हा अजित पवार गटात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचा 26 वा वर्धापन दिन झाला. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला अजित गव्हाणे आणि सहकारी उपस्थित नव्हते. याउलट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्धापन दिनापूर्वी गव्हाणे आणि टीमने भेट घेतली होती.

दुसरीकडे, अजित गव्हाणे यांचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी काहीदिवसांपूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली. किंबहुना, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सक्रीय झाले आहेत. कार्यक्रम आणि उपक्रमामध्ये हिरीरीने पुढाकार घेत आहेत. त्यामुळे गव्हाणेही माघारी फिरणार असा अंदाज वर्तवला जात होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे राजकीय विश्वासार्हतेचा मुद्दा समोर आला आहे. कार्यकर्ते आणि मतदारांनाही संभ्रमात पडल्यासारखे होत आहे.

गव्हाणेंकडे संयम आणि आत्मविश्वास नाही?

अजित गव्हाणे यांच्यासमोर आजच्या घडीला किमान 25 माजी नगरसेवकांची फौज आहे. लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीने गाजवली. तो ट्रेंड विधानसभेत राहील, या अपेक्षेने गव्हाणे यांनी राष्ट्रवादी शरद गटात प्रवेश केला. अजित पवार यांच्याशी फारकत घेतली आणि महायुतीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत भाजपाला विरोध म्हणून गव्हाणेंच्या पारड्यात 1 लाख 49 हजार 859 मते टाकली आहेत. असे असतानाही भाजपा किंवा महायुतीला प्रखर विरोधक अशी संधी असतानाही, गव्हाणे संयमी राजकारण करीत नाही. भाजपाविरोधात लढणारा संयमी चेहरा होण्याची संधी गव्हाणेंना होती, मात्र आत्मविश्वासाने लढण्याची तयारी करीत नाहीत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

शहरातील प्रलंबित विकासाकामांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी सहकारी सोबत होते. उर्वरित चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल.
– अजित गव्हाणे, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी. 

अजित पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी… Mission PCMC

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून 2017 पर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकहाती सत्ता होती. 2014 पासून विधानसभा आणि 2017 मध्ये महापालिका असे राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूंग लागला. बलाढ्य राष्ट्रवादीला हरवणारे राष्ट्रवादीचेच नेते होते, ही वस्तुस्थिती आहे. अंतर्गत दुफळी आणि राजकीय विश्वासार्हता गमावल्यामुळे राष्ट्रवादीचे शहरात पानीपत झाले आहे. 2009 पासूनच्या विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकीचे निरीक्षण केले असता, राष्ट्रवादीची क्षमता असतानाही केवळ ‘Political credibility’ संपलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता खेचून आणण्यात यश मिळत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपदासारखे मंत्री दर्जाचे पद दिल्यानंतरही शहरात राष्ट्रवादीच प्रभाव दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संधीसाधुंना नव्हे, तर नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button