केरळच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला; व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

V. D. Satheesan | केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेला नेतृत्वाचा पेच अखेर मिटला आहे. काँग्रेस नेतृत्वाने अनुभवी नेते व्ही. डी. सतीशन यांची केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. या निर्णयामुळे सतीशन यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला असून, राज्यात आता काँग्रेसप्रणीत यूडीएफचे (UDF) सरकार स्थापन होणार आहे.
४ मे रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये केरळमधील डाव्या आघाडीचा पराभव करत यूडीएफने स्पष्ट बहुमत मिळवले होते. मात्र, मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत चुरस निर्माण झाली होती. या पदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल, माजी गृहमंत्री रमेश चेन्नीथला आणि व्ही. डी. सतीशन यांच्यात तीव्र स्पर्धा होती. तिन्ही नेत्यांचे स्वतंत्र समर्थक गट असल्याने हायकमांडसमोर मोठा पेच निर्माण झाला होता.
हेही वाचा
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बाईकने प्रवास
राहुल गांधींच्या मध्यस्थीने पेच सुटला
राज्यातील या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी गेल्या १० दिवसांत दिल्लीत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. केरळमधील दिग्गज नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. स्वतः लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या तिन्ही नेत्यांशी आणि त्यांच्या समर्थकांशी सविस्तर चर्चा केली. अखेर सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर आणि राज्यातील समीकरणे लक्षात घेता, हायकमांडने गुरुवारी १४ मे रोजी व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले.
निकालांनंतर १० दिवसांनी घोषणा
केरळमध्ये सत्तांतर झाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा निर्णय रखडल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. के. सी. वेणूगोपाल केंद्रात कार्यरत असल्याने आणि रमेश चेन्नीथला यांचा प्रदीर्घ अनुभव असल्याने निवड कुणाची होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर १० दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सतीशन यांच्या रूपाने केरळला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे.





