Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

आरबीआयचे नवीन पतधोरण जाहीर; ‘रेपो रेट’ ५.२५ टक्क्यांवर जैसे थे

RBI Monetary Policy Meeting June 2026 | तुमच्या घराचे किंवा गाडीचे कर्ज स्वस्त होणार की नाही, या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या (MPC) तीन दिवसांच्या बैठकीतील निर्णयांची अधिकृत घोषणा केली. मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष आणि इंधनदरवाढीचे संकट या पार्श्वभूमीवर आरबीआयने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कोणताही बदल न करता रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बहुतांश अर्थतज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या अंदाजानुसार, रिझर्व्ह बँकेने महागाई आणि आर्थिक विकास यांच्यात योग्य समतोल राखण्यासाठी व्याजदर ‘जैसे थे’ ठेवणे पसंत केले आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्ज (Home Loan) आणि कार कर्ज (Car Loan) घेणाऱ्या ग्राहकांचे मासिक हप्ते (EMI) तूर्तास स्थिर राहतील. मात्र, चालू आर्थिक वर्षात कर्ज आणखी स्वस्त होतील अशी आशा बाळगून असलेल्या ग्राहकांची यामुळे काहीशी निराशा झाली आहे.

गेल्या वर्षभरात सव्वा टक्क्यांची मोठी कपात

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात कर्जदारांना टप्प्याटप्प्याने खूप मोठा दिलासा दिला होता. वेगवेगळ्या पतधोरण बैठकांमध्ये बँकेने एकूण १.२५ टक्क्यांनी रेपो रेट कमी केला होता. यामध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये ०.२५%, एप्रिल २०२५ मध्ये ०.२५% आणि जून २०२५ मध्ये ०.५०% ची मोठी कपात केली होती. त्यानंतर शेवटची कपात डिसेंबर २०२५ मध्ये ०.२५% करून रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर आणला गेला होता, जो आताही कायम ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा

राज्यभर इंधनाची उपलब्धता स्थिर; इंधन वितरणावर कोणतेही निर्बंध नाहीत

रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयकडून सर्व शक्तीचा वापर

गेल्या वर्षभरात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत तब्बल १० टक्क्यांहून अधिक घसरल्याने विनिमय दर हा देशाच्या चिंतेचा विषय बनला आहे. रुपयाची ही घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. आरबीआयने स्पॉट आणि फॉरवर्ड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी चलनाची (Foreign Exchange) विक्री केली आहे. बाजारात तरलता आणि स्थिरता आणण्यासाठी ‘स्वॅप विंडोज’ आणि लिलाव आयोजित केले गेले आहेत. तसेच रुपयाच्या घसरणीवर सट्टेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करत नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

रुपया सध्या ‘अंडरव्हॅल्यूड’; व्याजदर वाढवण्याचा दबाव

रिझर्व्ह बँकेच्या मते, सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे रुपयाचे मूल्य प्रमाणाबाहेर घसरले असून तो त्याच्या वास्तविक मूल्यापेक्षा कमी (Undervalued) आहे. रुपयाचा ‘रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट’ (REER) एप्रिल महिन्यात ९०.९६ पर्यंत खाली आला आहे, जी सप्टेंबर २०१३ नंतरची सर्वात नीचांकी पातळी आहे. यामुळे रुपयाचे मूल्य सुधारण्यासाठी आरबीआयवर आगामी काळात व्याजदर वाढवण्याचा मोठा दबाव असला, तरी सध्या तरी बँकेने मवाळ भूमिका घेत दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button