‘माझ्यासाठी शरीयत संविधानापेक्षा श्रेष्ठ’; झारखंडच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

Hafizul Hassan | झारखंड सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण आणि जलसंपदा मंत्री हफीजुल हसन अन्सारी यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानं देशाच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. त्यांनी म्हटलं की, त्यांच्यासाठी इस्लामिक शरीयत कायदा हा भारतीय संविधानापेक्षा श्रेष्ठ आहे. या वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) इतर पक्षांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
हफीजुल हसन अन्सारी म्हणाले, शरीयत कायदा माझ्यासाठी सर्वोच्च आहे. आम्ही मुसलमान काळजात कुराण आणि हातात संविधान घेऊन चालतो. आम्ही आधी शरीयत मानतो, नंतर संविधान. माझा इस्लाम हेच सांगतो आणि शिकवतो.
हेही वाचा : ‘मुंबई-गोवा महामार्ग जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार’; नितीन गडकरी
या वक्तव्यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेत अन्सारी यांच्या बडतर्फीची मांगणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी म्हटलं, हफीजुल हसन यांचं वक्तव्य संविधानाचा अवमान करणारं आहे. काँग्रेस आणि झारखंड मुक्ति मोर्चा (झामुमो) यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं आणि अशा मंत्र्याला तात्काळ बडतर्फ करावं. त्यांनी पुढे असा दावा केला की, हे वक्तव्य काँग्रेस-झामुमो आघाडीच्या तुष्टीकरणाच्या धोरणाचं प्रतिबिंब आहे.
केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनीही या वक्तव्याचा निषेध केला. ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी असं वक्तव्य करणं अत्यंत निंदनीय आहे. संविधान हाच देशाचा आधार आहे आणि कोणताही कायदा त्याच्यावर श्रेष्ठ असू शकत नाही.