पिंपरी-चिंचवड भाजपा ‘‘भाकरी फिरवणार’’ : शहराध्यक्षपदासाठी कोण असेल ‘‘डार्क हॉर्स’’ शत्रुघ्न काटे की विलास मडिगेरी?
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष: कार्यकारिणीतील पदवाटपावरुन चिंचवड अन् भोसरीमध्ये खलबते!

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘भाकरी फिरवण्याची’’ तयारी सुरू झाली आहे. पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्यात येणार असून, चिंचवड मतदार संघातील माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि भोसरी मतदार संघातील विलास मडिगेरी यांच्यापैकी एकाला शहराध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून, भाजपाकडून संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू केली आहे. प्रदेश पातळीवर कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार रविंद्र चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर प्रत्येक जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 8 मंडल होते. नवीन संघटनात्मक रचनेनुसार एकूण 14 मंडलांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याअनुशंगाने मंडलाध्यक्ष निवडणूक होणार आहे. तसेच, शहर कार्यकारिणीचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस अशा विविध पदांसाठी निवडणूक कार्यक्रम निश्चित केला आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी 2014 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 2019 मध्ये आमदार महेश लांडगे यांच्याकडे शहराध्यक्षपदची जबाबदारी देण्यात आली. जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. तत्पूर्वी, शंकर जगताप यांनी शहराध्यक्ष म्हणून शहर भाजपाचा कारभार पाहिला.
दरम्यान, आमदार रविंद्र चव्हाण यांना कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यानंतर इकडे पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारी शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक कामकाजामध्ये काटे सक्रीय आहेत. तसेच, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी हेसुद्धा शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते.
शत्रुघ्न काटे यांना सुप्त विरोध… (पिंपरी-चिंचवडमध्ये)
भाजपा शहर कार्यकारिणीवर वर्चस्व ठेवण्यासाठी चिंचवड आणि भोसरी दोन्ही मतदार संघातील पक्षाच्या आमदारांमध्ये खलबतं सुरू आहेत. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत शत्रुघ्न काटे यांनी तिकीटासाठी मागणी केली होती. मात्र, त्यांना संघटनात्मक पद देवू… असे सांगून समजूत काढल्याचे बोलले जाते. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी काटे यांना कार्यकारी शहराध्यक्षपदाची जबाबदारीही दिली आहे. त्यामुळे शत्रुघ्न काटे यांचे पारडे जड असून, शहराध्यक्षपदासाठी त्यांची वर्णी लागेल, असे चित्र आहे. मात्र, 2029 च्या विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी नको, म्हणून एका गटाचा शत्रुघ्न काटे यांना सुप्त विरोध आहे. त्यासाठी माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना अप्रत्यक्ष ‘सपोर्ट’ मिळाला असून, निष्ठावंत गटाचा चेहरा म्हणून त्यांचे नाव पुढे करण्यात येत आहे, अशी कुजबूज शहर भाजपामध्ये ऐकायला मिळत आहे.