पार्थ पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीत, शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं : संजय राऊत
मुंबई | “पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख प्रवक्ते नाहीत. त्यांचे वडील अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत”, अशी भूमिका शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. याप्रकरणावर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
“शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली असेल, एखादं वक्तव्य केलं असेल तर त्यावर फार चिंता करण्याचं कारण नाही. शरद पवारांना ओळखणं कठीण आहे. तरीही जे शरद पवार यांना ओळखतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे, पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं. त्यांचा अनुभव, त्यांची ज्येष्ठता, या देशाच्या राजकारणावरील त्यांचं स्थान पाहिल्यावर यामध्ये मीडियाने न पडलेलं बरं”, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी पार्थ पवार यांच्याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. “पार्थ पवारांच्या भूमिकेवर मी कशाला बोलू? त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने त्यावर मत व्यक्त केलं आहे. मी त्यावर मत व्यक्त करणार नाही. मी माझ्या पक्षाच्या भूमिकांवर मत व्यक्त करणार”, असं संजय राऊत म्हणाले.
“पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. ते लोकसभेचे उमेदवार होते. ते पवार कुटुंबातील घटक आहेत. त्यांनी मत व्यक्त केलं. त्यावर त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. मला वाटतं तेवढ्यापुरताच तो विषय संपला”, अशी भूमिका संजय राऊत यांनी व्यक्त केली.





