‘पवना बंद जलवाहिनी’ प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
मावळच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन 'पवना जलवाहिनी' पूर्ण होणार- शंकर जगताप

पिंपरी | औद्योगिक नगरीच्या भविष्यासाठी वरदान ठरणाऱ्या आणि जल सुरक्षेची हमी देणाऱ्या ‘पवना बंद जलवाहिनी’ प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवडच्या पुढील ३० वर्षांच्या पाण्याचे नियोजन आणि वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडल्याने या रखडलेल्या प्रकल्पाला आता मोठी गती मिळणार आहे. शेतकऱ्यांचे पुनर्वसन आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या या सर्वांचा सकारात्मक आढावा घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक देखील आयोजित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.मावळच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊनच ‘पवना जलवाहिनी’ पूर्ण होणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी यावेळी सांगितले.
विधानभवन, मंत्रीमंडळ सभागृह मुंबई येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार श्रीरंग बारणे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे तसेच पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आणि नगरविकास, महसूल, रेल्वे, एमएसआरडीसी, महावितरण, पीएमआरडीए व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आमदार शंकर जगताप यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या पाणीप्रश्नाला कायमची गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
हेही वाचा
स्मार्ट सिटीच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा..!
मावळच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊनच प्रकल्प पूर्ण होणार
हा प्रकल्प पूर्ण करताना मावळ मधील शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय केला जाणार नाही, अशी ग्वाही देतानाच शेतकऱ्यांचे पुनर्वसन आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या या सर्वांचा सकारात्मक आढावा घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक देखील आयोजित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मावळ आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही परिसराला समान न्याय मिळेल, याच भूमिकेतून आगामी काळात सर्व संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन तोडगा काढण्यात येईल.असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
‘पवना बंद जलवाहिनी’ प्रकल्प हा पिंपरी-चिंचवडच्या जल सुरक्षेसाठी वरदान ठरणार आहे आणि याला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. पिंपरी-चिंचवडकरांना आणि विशेषतः मावळमधील माझ्या शेतकरी बांधवांना, भूमिपुत्रांना आश्वस्त करू इच्छितो की, हा प्रकल्प पुढे नेताना मावळच्या शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यांच्या प्रलंबित मागण्या आणि पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.मावळ आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही भागांना समान न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. म्हणूनच, मावळमधील सर्व संस्था, संघटना आणि शेतकरी प्रतिनिधींना सोबत घेऊन, त्यांच्याशी सन्मानपूर्वक चर्चा करूनच आगामी उच्चस्तरीय बैठकीत यावर कायमस्वरूपी व सर्वसमावेशक तोडगा काढला जाईल. शहराचा विकास करताना ग्रामीण भागातील शेतकर्यांचे हित जपणे हीच आमची संस्कृती आहे.
– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ.





