ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्मार्ट सिटीच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा..!

पावसाळ्यात खोदकामाला दिलेल्या विशेष परवानगीला शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांचा तीव्र विरोध

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत पावसाळी कालावधीत खोदकामास बंदी असताना स्मार्ट सिटी कंपनीला तब्बल ३८ किलोमीटर खोदकामासाठी देण्यात आलेल्या विशेष परवानगीवर शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना सविस्तर पत्र देत प्रशासनाच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

महानगरपालिका हद्दीत दरवर्षी १५ मे ते १५ ऑक्टोबर या कालावधीत कोणत्याही प्रकारचे रस्ते खोदकाम करण्यास मनाई असते. मात्र या नियमाला डावलून स्मार्ट सिटी कंपनीसाठी विशेष परवानगी देण्यात आल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे. पावसाळ्यातील खोदकामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होतो, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा

आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांच्याकडून पालखी मार्गावरील सुविधांची पाहणी

उबाळे यांनी आपल्या पत्रात अलीकडील दुर्दैवी घटनांचाही उल्लेख केला आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत प्रशासन व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. याचप्रमाणे मुंबईतही खड्ड्यांमुळे नागरिक गंभीर जखमी होणे व मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये अशीच घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल त्यांनी आयुक्तांना केला आहे.

दरम्यान, या पत्रामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, शिवसेनाकडून या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पावसाळ्यात खोदकामास बंदी असताना विशेष परवानगी देणे म्हणजे नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ आहे. अशा खोदकामामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आयुक्त स्वतः घेणार आहेत का, तसे असेल तर त्यांनी माध्यमांसमोर येऊन याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य न देणारा ढिसाळ व बेफिकीर कारभार सहन केला जाणार नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने हा धोकादायक निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.

– सुलभा उबाळे, शिवसेना उपनेत्या, नगरसेविका, पिं. चिं. मनपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button