‘पुरवणी बजेटमध्ये सगळं भरून काढू’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छ. संभाजीनगर : बजेटमध्ये काही खात्यांना कमी निधी मिळाला. मात्र, कुठल्याच खात्यावर अन्याय करण्याची सरकारची भूमिका नाही. सरकारला काटकसर करावी लागत आहे.
आता कमी निधी मिळाला असेल, मात्र पुढे जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये हे सगळ भरून काढू असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
सामाजिक न्याय खात्याचा निधी वर्ग केल्याने मंत्री संजय शिरसाठ नाराज झाले होते, याबाबत माध्यमांनी विचारले असता शिंदेंनी वरिल उत्तर देताना शिरसाठांच्या नाराजीला अर्धविराम देण्याचा प्रयत्न केला.
लाडकी बहीण योजना सुरू केल्याने राज्य सरकारच्या बजेटवर याचा मोठा भार पडला आहे. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी सरकारची चांगलीच दमछाक होत आहे. नुकतेच अर्थ खात्याने सामाजिक न्याय खात्यातून ४१० कोटी रुपये वर्ग केले आहेत.
हेही वाचा – ‘ग्रामीण भागात उद्यमशीलतेच्या संधी निर्माण करणार’; विनायक भोंगाळे
यापूर्वी देखील याच खात्यातून निधी वर्ग करण्यात आला होता. मात्र, विश्वासात न घेता परस्पर निधी वर्ग केल्याने शिंदे सेनेचे फायर बँड नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चांगलेच संतापले होते.
निधी ठेवणार नसेल तर हे खाते बंद करून टाका असा सल्ला देखील शिरसाठ यांनी सरकारला दिला होता. दरम्यान बुलढाणा दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले होते.
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या निधी वळवण्यात आल्याचा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावेळी या मुद्दावर अगदी स्पष्ट बोलताना एकनाथ शिंदे हे दिसले.