भारत-पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये चर्चा !

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी मोहिमा महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) सोमवारी सायंकाळी चर्चा झाली. मात्र, हॉटलाईनवरून झालेल्या त्या चर्चेचा तपशील तातडीने समजू शकला नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला.
त्या हल्ल्याचा हिशेब चुकता करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्या मोहिमेच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतातील विविध ठिकाणी हल्ल्यांचा प्रयत्न केला.
मात्र, ते नापाक मनसुबे सतर्क आणि सज्ज असणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांनी उधळून लावले. पाकिस्तानकडून हल्ल्यांचा प्रयत्न अन् भारताकडून जोरदार प्रत्युत्तर असे चित्र ४ दिवस होते. त्यामुळे दोन्ही देशांतील संघर्ष भडकण्याची चिन्हे निर्माण झाली. मात्र, भारताचा जोर पाहून पाकिस्तान नरमला. त्या देशाच्या डीजीएमओनी भारतीय डीजीएमओशी शनिवारी संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षविराम करण्याविषयी समझोता झाला.
हेही वाचा – सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, सुशोभीकरण; शिवेंद्रसिंहराजेंकडून ५० कोटींचा निधी
त्या समझोत्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये सोमवारी दुपारी १२ वाजता हॉटलाईनवरून चर्चा निश्चित करण्यात आली. मात्र, ती चर्चा दुपारऐवजी सायंकाळी ५ वाजता झाली. समझोत्याशी संबंधित विविध बाबींवर दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
समझोत्यानंतर काही तासांतच त्याचे उल्लंघन करून पाकिस्तानने शनिवारी रात्री काही भारतीय ठिकाणांवर मारा करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत भारताकडून चर्चेवेळी शेजारी देशाला खडसावले गेले असण्याची शक्यता आहे. चर्चेत भारताकडून लेफ्टनंट जनरल राजीव घई, तर पाकिस्तानकडून मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला सहभागी झाले.