अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी.

अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसऱ्याला फसविण्याकरिता नसावा. स्वत:चे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचे मन दुखवू नये, आणि देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. कामक्रोधादि सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यांसारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही.

हेही वाचा –  ‘पुरवणी बजेटमध्ये सगळं भरून काढू’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपली वाचा दुसऱ्याला शिकविण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते. नेहमी सत्य आणि गोड बोलावे, आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वत:ची चित्तशुद्धी करून घेऊन, संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. अभिमानाचे विष जिथे येते, तिथे नामाची आठवण ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही; पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे, तसे हिरण्यकश्यपूचे झाले. स्वत:च्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानामुळे विसरला. त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले. अभिमान जरुरीपुरताच ठेवावा. ‘ मी रामाचा आहे ’ असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. ‘ नारायणाचे दर्शन व्हावे ’ असे नाही प्रह्लाद म्हणाला, ‘ नाम नाही सोडणार ’ असे म्हणाला.

लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच, आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटणार नाही; म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण हे वयावर अवलंबून नसून, आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत; त्यापासून आपलेच मन गढूळ होते. ‘ माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस, ’ असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. मला खात्री आहे, तो तुमच्या साहाय्याला आल्यावाचून राहणार नाही.

बोधवचन:- वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच वस्तू स्थिर आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button