MNS: पिंपरी-चिंचवडमध्ये मनसेच्या संघटनबांधणीला नवे बळ!
अमित राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संघटनात्मक बळकटीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात महत्त्वपूर्ण हालचालींना वेग आला आहे. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते अमित राजसाहेब ठाकरे, अविनाशजी अभ्यंकर आणि राज्य सरचिटणीस अजय खोपकर यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर प्रथमच अमित ठाकरे आणि अविनाश अभ्यंकर यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा करत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान विविध संघटनांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विद्यार्थी सेना, वाहतूक सेना, कर्मचारी सेना, चित्रपट सेना, जनहित व विधी कक्षा तसेच महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र ‘वन टू वन’ संवाद साधण्यात आला. या चर्चांमध्ये पक्षबांधणी, महानगरपालिका स्तरावरील कामकाज तसेच शहरातील राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
शहराध्यक्ष सचिन चिखली यांनी सांगितले की, सुमारे चार ते पाच तास चाललेल्या या संवादात शेकडो मनसैनिकांनी सहभाग घेतला. नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या भेटीनंतर पक्षकार्य अधिक गतिमान होईल, तसेच प्रत्येक कार्यकर्ता नव्या जोमाने संघटनात्मक कामात सहभागी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अमित ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने शहरात उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी शहरातील पत्रकारांशीही संवाद साधत स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली. अमित ठाकरे यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पक्षबांधणीला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक आणि तरुणाईचे शहर असून इथल्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने इथे उपस्थित राहणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याशी थेट संवाद साधून संघटन अधिक मजबूत करणे आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. मनसेचे विचार आणि कामाची दिशा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर आमचा भर राहील.
– अमित ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.





