महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हेवा वाटेल असे स्मारक उभारू; अण्णा बनसोडे
माता रमाई स्मारकाच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी व आढावा

पिंपरी-चिंचवड | पिंपरी येथे उभारण्यात येत असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्प शहरातील आंबेडकरी जनतेच्या तब्बल २२ वर्षांच्या संघर्षलढ्याचे यश आहे. हा आनंदाचा क्षण असून महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हेवा वाटेल असे रमाई स्मारक उभारू, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले. रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या २८ एप्रिलला होत आहे, या पार्श्वभूमीवर बनसोडे यांनी या स्मारकस्थळाची पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, सह शहर अभियंता मनोज सेठीया, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विजय जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी बनसोडे म्हणाले, “त्यागमूर्ती माता रमाई स्मारक ही केवळ एक स्मारक नसून, आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. या स्मारकाच्या माध्यमातून माता रमाई यांचा त्याग आणि त्यातून उभे राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य याचे प्रभावी दर्शन नागरिकांना घडेल. हा रमाई सृष्टीचा भव्य आणि दर्जेदार प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासोबतच प्रकल्पात कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही.” माता रमाई स्मारक उभारणीमुळे शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक ओळखीमध्ये भर पडणार असून, हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास यावेळी बनसोडे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
पावसाळ्यापूर्वी हिंजवडीतील नालेसफाई, रस्ते दुरुस्तीला गती द्या!
सदर पाहणीवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्मारकाच्या नियोजित आराखड्याची माहिती सादर केली. स्मारकाचे काम नियोजनबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना अण्णा बनसोडे यांनी दिल्या.
पिंपरीत साकारणार आधुनिक माता रमाई स्मारक सृष्टी…
पिंपरी चौक येथे उभारण्यात येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्पासाठी २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, सुमारे २४९८.९७ चौरस मीटर क्षेत्रावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या अंतर्गत मजबूत आरसीसी स्ट्रक्चर, आकर्षक म्युरल्स, जीआरसी काम, पुतळ्यासाठी सुबक चौथरा व प्रतीक्षालय उभारण्यात येणार आहे. परिसरात प्रवेश कमान, पादचारी मार्ग, लँडस्केप गार्डन, कारंजे व आधुनिक रोषणाईची व्यवस्था केली जाणार आहे. नागरिकांसाठी स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी रॅम्प व लिफ्ट तसेच बसण्याची सुविधा उपलब्ध असेल. यासोबतच क्युआर कोड व बहुभाषिक ऑडिओ प्रणालीसारख्या डिजिटल सुविधांमुळे नागरिकांना माता रमाई यांच्या जीवनकार्याची माहिती अधिक प्रभावीपणे अनुभवता येणार आहे.





