भाजपाकडून निवडणुकांचे रणशिंग !
रवींद्र चव्हाणांच्या रूपाने प्रदेश 'टीम भाजपा' ला नवीन कॅप्टन, आगामी निवडणुका जिंकण्याची मोठी जबाबदारी!

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आणि ‘टीम भाजपा’ ला नवीन कॅप्टन मिळाला. रवींद्र चव्हाण हे आधीच महाराष्ट्र भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर होते. त्यामुळे, या पदासाठी ते योग्य व्यक्ती आहेत, यावर भाजपमध्ये एकमत होते. या निवड सोहळ्यासाठी भाजपाने खास अधिवेशन बोलावले होते, त्यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांची भाषणे झाली आणि सर्वांनी निवडणुकीची तयारी केल्याचे स्पष्ट झाले. यातील प्रमुख वक्त्यांनी ठाकरे बंधू आणि भाषासक्ती या विषयांवर कडाडून हल्ला चढवला, तसेच विरोधकांवर तोंडसुख घेतले.
फडणवीस यांचे विश्वासू सहकारी..
रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे नेते अशीही त्यांची ओळख आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर ते भाजपा चे बारावे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
फडणवीस, बावनकुळे कडाडले..
रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करताना आणि त्यांना शुभेच्छा देताना जी भाषणे झाली, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आणि त्यांच्या दुटप्पी धोरणावर कडाडून टीका केली. यापुढे ‘फेक नॅरेटिव्ह’ सुरू होईल, अशी सूचना फडणवीस यांनी दिली. लोकसभेच्यावेळी विरोधकांनी हेच केले आणि मते मिळवली, असा आरोपही त्यांनी केला.
रवींद्र चव्हाण संघाच्या मर्जीतले..
नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे संघ परिवाराच्या मर्जीतले असून फडणणीस यांचे विश्वासू नेते आहेत. भारतीय जनता पार्टीचा एक साधा कार्यकर्ता म्हणून राजकीय सुरुवात केलेल्या चव्हाण यांनी मोठी भरारी मारली आहे. डोंबिवलीचा साधा नगरसेवक, नंतर स्थायी समितीचे सभापतीपद, चार वेळा आमदार, मंत्री आणि आता सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, अशी त्यांची दिमाखदार राजकीय वाटचाल आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर..
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. वरळीमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात चव्हाणांचे नाव जाहीर करण्यात आले. यावेळी या नियुक्तीचे निरीक्षक, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.
हेही वाचा : FACT CHECK : पिंपरी कॅम्प परिसरावर खरंच बुलडोझर फिरणार का?
भाजपाचे बारावे प्रदेशाध्यक्ष..
चव्हाण हे भाजपा चे बारावे अध्यक्ष असतील. मात्र, ते विरोधकांचे राजकीय तेरावे घालतील आणि विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाहीत, असे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.
सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना चव्हाण यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आता काम पाहतील.
निवडणुकांमध्ये यश मिळवणार..
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, तसेच महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणणे आणि भाजपा ला एक नंबरचा पक्ष बनवणे, हे माझ्या समोरील आव्हान असेल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. भाजपाचा मी एक साधा कार्यकर्ता आहे, आणि कार्यकर्त्याला मोठे करणारा हा पक्ष आहे. इतर पक्षांमध्ये हे शक्य नसते, असेही त्यांनी सांगितले.
कोण आहेत रवींद्र चव्हाण ?
यानिमित्ताने रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द पाहणे उचित ठरणार आहे. २००२ साली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. २००५ मध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक म्हणून एन्ट्री घेतली. त्यानंतर, २००७ मध्ये महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडली आणि २००९ पासून डोंबिवली विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून सलग चार वेळा आमदार म्हणून त्यांनी विजय मिळवला आहे.
राज्यमंत्र्याची मोठी जबाबदारी..
महाराष्ट्रात पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले, तेव्हा राज्यमंत्री म्हणून चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. २०१६ ते २०१९ या काळात बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या चार खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पेलली. रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून मोठा विकास साधला. २०२० साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक म्हणून संधी मिळाली आणि त्याचे त्यांनी सोने केले.
शिंदे मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री
हा राजकीय प्रवास सुरू असताना २०२२ साली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असताना दोन खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली. तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही मिळाली. अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री पदाच्या कारकिर्दीत ‘आनंदाचा शिधा’, ‘रेशन आपल्या दारी’ सारखे महत्त्वाचे उपक्रम त्यांनी राबवले आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले. र
कट्टर स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त!
रवींद्र चव्हाण हे कट्टर सावरकर भक्त असून मॉरिशसमध्ये महाराष्ट्र मंडळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा
स्थापन करण्यात मोलाचे सहकार्य केले. कोकणच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा ठरला आहे.
ठाकरे म्हणजे ‘फेक नॅरेटिव्ह’ ची फॅक्टरी !
उबाठा गट म्हणजे ‘फेक नॅरेटिव्ह’ ची फॅक्टरी आहे असा टोला फडणवीस यांनी आपल्या भाषणात लगावला. या मंडळींना विकास कामाच्या आधारे दूरदृष्टी देता येत नाही, विकास कामात अडथळे आणायचे आणि निवडणुका जवळ आल्या की ‘फेक नॅरेटिव्ह’ सुरू करायचा, हा यांचा धंदा झाला आहे. आता, पुढील निवडणुकांमध्ये महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव, मराठी संपवण्याचा डाव, मराठी माणूस अडचणीत असल्याच्या काहीतरी अफवा पसरवून मतांसाठी सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.