धुळे महापालिकेच्या बंद अवस्थेतील शाळांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
शाळांची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक वाईट झाल्याचे निरीक्षण

धुळे : शहरातील महापालिकेच्या शाळांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्कच धोक्यात आहे, असे म्हणत याप्रश्नी महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी केली आहे.
धुळे महापालिकेच्या एकूण ४२ पैकी केवळ १८ शाळा सध्या सुरू आहेत. काही ठिकाणी शाळांच्या जागांवर व्यापारी संकुले उभी राहिली आहेत. सध्या सुरू असलेल्या शाळांमध्ये केवळ दोन मराठी शाळा आहेत. उर्वरित १६ शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत. महत्त्वाच्या भागांतील शाळांच्या जागा व्यावसायिक वापरासाठी दिल्या गेल्या आहेत. उर्वरित शाळांमध्ये पाणी, स्वच्छतागृहे आणि बेंच यांचा अभाव आहे.
काही वर्गांत फक्त दोन बेंचची सोय असल्याने विद्यार्थ्यांना बसायलाही जागा नाही. काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आणि विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. महापालिकेच्या एका शाळेत दहावीचे फक्त २६ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील १४ विद्यार्थी नापास झाले, तर १२ विद्यार्थी काठावर पास झाले, ही लाजीरवाणी बाब असल्याचे श्री. माळी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Bengaluru Stampede | ११ चाहत्यांच्या मृत्यूला RCB जबाबदार, CAT चा मोठा निर्णय
उपाययोजना कराव्यात
महापालिका प्रशासनाने बंद शाळा तातडीने सुरू कराव्यात. सर्व शाळांत दुरुस्ती, रंगरंगोटीसाठी निधी उपलब्ध करावा. बीओटी तत्त्वावर सामाजिक संस्थांना शाळा चालवण्याची संधी द्यावी. अशा संस्थांनी गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आणि कमी शुल्काची हमी द्यावी.
शाळांच्या जागांचा वापर केवळ शिक्षणासाठी व्हावा. व्यापारी संकुले बनलेल्या जागा परत मिळवून शिक्षणासाठी वापराव्यात. खासगी शाळांमध्ये होणारी लूट थांबविण्यासाठी ठोस धोरण आखावे. चार महिन्यांपूर्वी शाळांच्या रंगरंगोटीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात त्याचा उपयोग कुठे झाला याबाबत माहिती उपलब्ध नाही.
दरम्यान, शाळांची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक वाईट झाल्याचे निरीक्षण आहे. महापालिकेच्या अशा गलथान कारभारामुळे धुळेकर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे. शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये, यासाठी शासन व महापालिकेने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी श्री. माळी यांनी केली आहे.