मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला अर्थसंकल्प; काय आहेत 10 महत्त्वाचे निर्णय?

Maharashtra Budget 2026 | राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (६ मार्च) महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडण्याची घटना घडली. हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंतच्या विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्पांची घोषणा केली. तसेच दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत हा अर्थसंकल्प त्यांना समर्पित केल्याचेही त्यांनी जाहीर केले.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
१. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना
महात्मा फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत असल्याने विविध कार्यक्रमांसाठी समिती स्थापन करून निधी दिला जाणार आहे. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित केले जाणार आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
२. अजित पवार यांचे स्मारक
दिवंगत अजित पवार यांनी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारले जाईल आणि त्यांच्या नावाने नागरी सेवा पुरस्कार सुरू केला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
३. ग्रामीण रस्ते आणि वाहतूक प्रकल्प
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत ३० हजार गावे जोडली गेली असून २,४५० किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच २३ हजार पूलांच्या कामांना गती देण्यात आली आहे. मुंबई–पुणे जलदगती ट्रेनसाठीही तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा : अजितदादांचं भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
४. शेती आणि शेतकरी कल्याण
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजुरांचा समावेश केला जाणार आहे. अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत. पुढील दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात येणार आहे.
५. उद्योग आणि गुंतवणूक
राज्याचे नवीन गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म व लघुउद्योग केंद्र उभारले जाणार असून ५० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गडचिरोली हे नवे स्टील हब म्हणून विकसित केले जात आहे.
६. तंत्रज्ञान आणि गेमिंग उद्योग
मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्यात येणार आहे. पुणे हे जीसीसीसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे शहर असल्याचे सांगत राज्यात २९५ पेक्षा अधिक गेमिंग स्टुडिओ उभारण्याची योजना जाहीर करण्यात आली.
७. पर्यटन प्रकल्प
सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला येथे पर्यटकांसाठी रोपवे प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच नागपूरच्या रामटेक येथे तिसरी चित्रसृष्टी उभारण्याची घोषणा करण्यात आली.
८. मेट्रो आणि द्रुतगती मार्ग
मुंबईत आणखी एक भुयारी मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडला जाणार आहे. राज्यात १,२०० किमी मेट्रो मार्ग आणि ६,००० किमी द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
९. शेतकरी कर्जमाफी
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाईल.
१०. लाडकी बहीण योजना कायम
महिलांसाठी सुरू असलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” पुढेही सुरू ठेवण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.





