३० जुलैपर्यंत राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात; शिक्षण विभागाचा नवा आदेश
पुणे : राज्यातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३० जुलैपर्यंत राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शक्यतो सकाळच्या सत्रात भरवाव्यात, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार, BLO म्हणून नियुक्त शिक्षकांच्या अध्यापनाच्या तासिका शक्यतो कमी व सलग ठेवाव्यात, तसेच BLO नसलेल्या शिक्षकांनी आवश्यकतेनुसार त्यांना सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, शिक्षकांनी शाळेतील अध्यापनाचे काम सलग पूर्ण करून उर्वरित वेळेत मतदारयादी पुनरीक्षणाची जबाबदारी पार पाडावी. तसेच शाळा प्रमुखांनी अंतर्गत कामाचे नियोजन करून BLO शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणार नाही, याची काळजी घ्यावी. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करून त्याचा अनुपालन अहवाल शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या निर्णयावर शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत चालणाऱ्या शाळा एकाच सकाळच्या सत्रात कशा भरवणार, तसेच BLO शिक्षकांना सलग अध्यापनाचे तास देणे प्रत्यक्षात शक्य नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
शिक्षक महासंघाचे अनिल बोरनारे यांनी, “शाळेचे काम सांभाळत BLOची जबाबदारी पार पाडणे हा शिक्षकांचा मानसिक आणि शारीरिक छळ आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.





