अजितदादांचं भव्य स्मारक उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचे २८ फेब्रुवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाले. या भीषण दुर्घटनेनंतर राज्यासह देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या नावाने भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली.
अर्थसंकल्प सादर करताना आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांची आठवण काढली. मुख्यमंत्री म्हणाले की, हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेते अजितदादा पवार आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
अर्थमंत्री म्हणून आजवर असंख्य वेळा अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, याची आठवण देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढली. मुख्यमंत्री म्हणाले, त्यांनी ऐकूण ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे.
अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावे गतीमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो. दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना आजचा हा अर्थसंकल्प मी समर्पित करतो, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.





