मुसळधार पावसात नागरिकांच्या मदतीसाठी मैदानात उतरले नगरसेवक राहुल कलाटे!
वाकड, पुनावळे परिसरातील सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी; तातडीच्या उपाययोजनांवर भर
पिंपरी चिंचवड : शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचणे, रस्त्यांची दुरवस्था आणि सोसायट्यांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवक राहुल कलाटे यांनी आपल्या प्रभागातील वाकड आणि पुनावळे परिसरातील विविध सोसायट्यांना प्रत्यक्ष भेट देत पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेताना राहुल कलाटे यांनी स्थानिक नागरिक, सोसायटी पदाधिकारी आणि रहिवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला.
यावेळी साचलेले पाणी काढणे, पाणी उपसल्यानंतर परिसराची स्वच्छता करणे, वीज वितरणातील अडचणी दूर करणे, रस्त्यांची स्वच्छता आणि आवश्यक दुरुस्तीची कामे प्राधान्याने करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेशी तसेच आपल्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन राहुल कलाटे यांनी केले.
राहुल कलाटे म्हणाले, “पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासन आणि स्थानिक पातळीवरील यंत्रणांशी सातत्याने समन्वय ठेवला जात आहे. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करणे हे आमचे प्राधान्य आहे.”
वाकड आणि पुनावळे परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याची गरज असल्याचेही यावेळी नागरिकांनी सांगितले. त्यानुसार भविष्यातील पावसाळी नियोजन, जलनिस्सारण व्यवस्था आणि मूलभूत सुविधांच्या सुधारणांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन राहुल कलाटे यांनी दिले. नागरिकांच्या अडचणीच्या काळात प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याने स्थानिक रहिवाशांकडून राहुल कलाटे यांच्या पाहणी दौऱ्याचे स्वागत करण्यात आले.
“नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत प्रत्यक्ष उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे. मुसळधार पावसामुळे वाकड आणि पुनावळे परिसरातील काही सोसायट्यांमध्ये निर्माण झालेल्या समस्या जाणून घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला आहे. साचलेले पाणी, स्वच्छता, वीज व्यवस्था आणि रस्त्यांच्या समस्यांवर प्राधान्याने काम सुरू आहे. नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित संपर्क साधावा.”
— राहुल कलाटे, नगरसेवक, भाजपा.






