Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

FACT CHECK : पिंपरी कॅम्प परिसरावर खरंच बुलडोझर फिरणार का?

सिंधी बांधवांना कोण फसवतंय ? : प्रारुप विकास आराखडा काय सांगतो?

पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारुप विकास आराखड्याचे भांडवल करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पिंपरी कॅम्पमध्ये स्थायिक झालेले व्यापारी बांधव आता बेघर होतील? किंवा त्यांच्या घरांवर… दुकानांवर बुलडोझर फिरणार… दुकानांच्या काय ते टपऱ्या होणार…? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

या पाश्वभूमीवर ‘महाईन्यूज’ ने FACT CHECK केले. धक्कादायक माहिती समोर आली… म्हणजे विकास आराखड्याच्या नावाखाली एखादा राजकीय अजेंडा कशाप्रकारे राबवला जावू शकतो. याचे उदाहरणच पिंपरी-चिंचवडकरांच्या समोर आम्ही मांडणार आहोत. कॅम्प परिसर हा शहराचे व्यापारी केंद्र… त्यामुळे तितकेच संवेदनशील आहे. मग, राजकीय विस्तव पेरणी करणे सहज सोपे नाही का?… मग, गावठाण घोषीत केले असते, तर काय झाले असते? सिंधी बांधवांना प्रश्न पडलाय की पुन्हा पुनर्वसन करण्याची वेळ येते की काय? पण… हा सर्व ‘फेक नॅरेटिव्ह’ चा प्रकार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

वास्तविक, पूर्वी मंजूर विकास योजनेप्रमाणे म्हणजेच कॅम्पातील रस्त्याचे नियोजन कायम ठेवले आहे… नवीन डीपीमध्ये एकही नवीन रस्ता प्रस्तावित केलेला नाही किंवा रुंदीकरणाचा प्रस्तावही नाही. कलम २०५ महानगरपालिका आयुक्त मंजुर विकास आराखड्यातील रस्त्यांच्या रुंदीबाबत अपवादात्मक निर्णय घेवू शकतात. मात्र, तसे प्रारुप विकास आराखड्यात अद्यापतरी काही झालेले नाही. काळेवाडी पूल ते पवनेश्वर मंदिर रस्ता नवीन 18 मीटर प्रस्तावित केला आहे. वाढती लोकसंख्या आणि शहराची गरज लक्षात घेता, तो आवश्यक आहे. त्यामुळे काही दुकाने किंवा घरे बाधित होतील, अशी शक्यता नाही. कारण, हा रस्ता महानगरपालिकेच्या मंजूर आराखड्यातील आरक्षणामध्ये प्रस्तावित केला आहे.

मग, साई चौक ते लालबहाद्दुर शास्त्री गार्डन, लालबहाद्दुर शास्त्री गार्डन ते साधु वासवानी चौक, लालबहाद्दुर शास्त्री गार्डन ते अशोक थिएटर, अशोक थिएटर ते तपोवन मंदिर रस्ता, साई चौक ते भाटनगर चौक, पिंपरी स्टेशन ते किम्मतराव आसवणी अंडरपास, रिव्हर रोड ते मिलिंदनगर हून पुढे डिलक्स टॉकी चौक, रवि सोसायटी ते अशोक थिएटर, एमपी कॉलेज समोरल कुदळे कॉलनी रस्ता ते औदुंबर अपार्टमेंट, वीर अभिमन्यू चौक ते तपोवर मंदिर चौक, माळी आळी रोड ते महावीर क्लिनीक असे रस्ते रुंदीकरण प्रस्तावित केले आहेत, असा शोध कोणी लावला? हा प्रश्न आहे. हेतुपूर्वक काही कथित पत्रपंडित जुना डीपी वाचून दाखवत नाहीत.

प्रारुप विकास आराखड्यात कॅम्पासाठी काय आहे?

पिंपरीतील आंबेडकर चौकातून गणेश हॉटेलकडे जाणारा जो रस्ता आहे. तो विकसित झालेला आहे. त्याच रस्त्याच्या अनुशंगाने मोरवाडी चौकाकडून पिंपरी कॅम्पात जाणारा या रस्त्यालगत मेट्रो स्टेशन आहे. त्या ठिकाणी पार्किंग आणि कमर्शिअल कॉम्प्लेक्स प्रस्तावित केले आहे. जुन्या डीपीमध्ये फक्त पार्किंगचे आरक्षण होते. नव्या डीपीमध्ये मेट्रोशी संबंधित आरक्षण प्रस्तावित केले आहे. यामध्ये एकही घर किंवा दुकान बाधित होत नाही. तसेच, जुन्या डीपीनुसार जी अनधिकृत पत्रा स्ट्रक्चर होती. ती आजही आहे तशीच आहेत. पिंपरी चौक ते कॅम्प हा रस्ता पूर्वीच्या मंजुर विकास योजनेनुसार प्रस्तावित असलेला रस्ता जागेवर विकसित झाला आहे. त्यामुळे रुंदीकरणचा प्रश्नच नाही. चिंचवड ते पिंपरी लिंकरोड लगत शगून चौकातील मंजूर विकास योजनेनुसारचे पोस्ट विभागाचे आरक्षण नवीन विकास योजनेत रद्द केले आहे. त्यामुळे सदर आरक्षणाने बाधित होणाऱ्या सर्व सिंधी बांधवांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. पोस्ट विभागाच्या आरक्षणामध्ये किमान ४०० ते ५०० दुकांने येतात ही वस्तुस्थिती सिंधी बांधवांनी लक्षात घेतली पाहिजे.

कापडबाजारातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण रद्द…

शगून चौक म्हणजे सिंधी बांधवांच्या व्यापाराचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. शगून चौकातून पिंपरी कॅम्पमार्गे आतील बाजुने दक्षिणेकडील कापडबाजारातून जाणारा लिंकरोडला जोडणारा प्रस्तावित रस्त्याचे रुंदीकरण जुन्या डीपीमध्ये आहे. मात्र, प्रारुप विकास योजनेमध्ये सदरचे रुंदीकरण रद्द केले आहे. त्यामुळे व्यापारी बांधवांनी दिलासा मिळणार आहे. सर्व्हे नं. १३, १५ आणि १७ मध्ये सध्या सर्व वापर वाणिज्य स्वरुपाचा आहे. त्यामुळे जुन्यामध्ये केवळ वाणिज्य तसेच सार्वजनिक आणि निमसार्वजनिक वापर प्रस्तावित होता. तथापि, प्रारुप विकास योजनेमध्ये सदर ठिकाणी रहिवास विभाग प्रस्तावित केला आहे. यामुळे भविष्यात मिळकतधारकांना रहिवास विभागात अपेक्षीत वापरानुसार बांधकाम परवागी मिळणार आहे, ही बाब व्यापारी बांधवांना सांगितली जात नाही. याउलट, आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केले जाते, हा अशोभनीय प्रकार आहे.

ब्ल्यू लाईन/ रेड लाईनमध्ये छेडछाड नाही…

कॅम्पपरिसराच्या पश्चिमेकडील पवना नदी लगत निळी व लाल पुररेषेची आखणी संबंधित जलसंपदा विभागामार्फत (WRDA) पुरवण्यात आलेली आखणीच कायम केली आहे. ब्ल्यू/ रेड लाईनमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड केलेली नाही. तसेच, पवना नदीलगत्या परिसरात पूर्वी मंजूर विकास योजनेत केवळ हरित पट्टा दर्शवला होता. प्रारुप विकास योजनेत नदी सुधार प्रकल्प अंतर्गत RFR योजना राबवण्याचेही प्रस्तावित केले आहे. त्यामुळे नदी संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि सुशोभिकरण या बाबींचा प्रारुप विकास योजनेत विचार झाला आहे, याचे स्वागत करायला पाहिजे.

प्रारुप विकास आराखड्यात सुयोग्य नियोजन…

पिंपरी रेल्वे स्थानकालगत दक्षिणेकडील अस्थित्वातील भाजी मंडईचे प्रारुप विकास योजनेमध्ये सुयोग्य नियोजन केले आहे. तसेच, त्या ठिकाणी पोलीस चौकीलाही जागा वाढीव उपलब्ध केली आहे. जुन्या डीपीमध्ये केवळ ‘स्लम इप्रुमेंट स्किम’चे आरक्षण दर्शवले होते. प्रारुप विकास योजनेमध्ये ‘नोटिफाईड’ आणि ‘नॉन नोटीफाईड स्लम’ असा उल्लेख स्पष्ट केला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी भविष्यात नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य प्रकारे घरकूल योजना अंमलात येवू शकेल. शासनाच्या योजनांनुसार, अधिकृतपणे घरकूल, प्रधानमंत्री आवास योजना राबवणे शक्य होणार आहे. झोपडपट्टीधारकांसाठी दिलासा देणारी आहे. तसेच, साई चौक ते मुंबई- पुणे जुन्या महामार्गाला जोडणारा रस्त्यालगत (रेल्वे अंडपासजवळील चौपाटी) सर्व्हे. नं. २०२ पिंपरी याठिकाणी नव्याने पार्किंग व उद्यानाचे आरक्षण प्रस्तावित केले आहे. ज्यामुळे पिंपरी कॅम्पात राहणारे नागरिकांना एक सुंदर उद्यान व रेल्वे स्टेशनला लागून पार्किंग सुविधा निर्माण करता येणार आहे. तसेच, याच रस्त्यालगत नव्याने पोलीस स्टेशन व पोलीस चौकीचे आरक्षणदेखील प्रस्तावित केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकी महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा: FACT CHECK : रुपीनगर-तळवडेतील घारजाई माता मंदिर पाडणार?

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button