मिशन विधानसभा : ‘निवडून आल्यास कोणाला पाठिंबा देणार, हे बापूसाहेब भेगडे यांनी जाहीर करावे’!
मावळ तालुक्यातील कॉंग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी
तळेगाव दाभाडे | अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना मत देण्याबाबत भाजपा बरोबरच महाविकास आघाडीचे मतदार द्विधा मनस्थितीत असल्याने ‘मावळ पॅटर्न’च्या नावाखाली निर्माण करण्यात आलेल्या फुग्यातील हवा निघून जाण्याच्या मार्गावर आहे. निवडून आल्यास सरकार बनवण्यासाठी कोणाला पाठिंबा देणार, हे बापूसाहेब भेगडे यांनी आधी जाहीर करावे, अशी मागणी तालुक्यातील काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार यांचे समर्थक असलेल्या बापूसाहेब भेगडे यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवून त्यांच्यामागे सर्व शेळके विरोधकांची एकत्रित ताकद उभी करण्याचा प्रयत्न स्वतःला तालुक्यातील ‘भाजपचे चाणक्य’ म्हणवून घेणाऱ्या नेत्याने चालवला आहे. भाजप व महाविकास आघाडीचे नेते बापूसाहेबांच्या व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र दिसत असले तर बापूसाहेबांना मत म्हणजे नेमके कोणाला मत, हा प्रश्न भाजप बरोबरच महाविकास आघाडीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सतावत आहे.
बापूसाहेब भेगडे यांना भाजपचे नेते मदत करीत असल्यामुळे निवडून आल्यानंतर बापूसाहेब भाजपलाच पाठिंबा देतील, असे भाजपच्या निष्ठावान मतदारांना सांगण्यात येत असल्यामुळे महा विकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सावध पावित्रा घेतला आहे. बापूसाहेब भेगडे यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केल्याशिवाय प्रचारात सक्रिय होणार नाही, असे बजावल्यामुळे बापूसाहेब भेगडे अडचणीत आले आहेत.
बापूसाहेब भेगडे हे दोन्ही दगडांवर पाय ठेवून स्वार्थाचे राजकारण करणार असतील, तर त्यांचे काम आम्ही का करायचे, असा प्रश्न काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत.
हेही वाचा – राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ ( इंटक) सीओडी देहूरोडचा आमदार महेश लांडगे यांना पाठींबा
बापूसाहेब भेगडे यांच्या व्यासपीठावर आम्ही उपस्थित राहिलो असलो तरी आमच्या पक्षांनी बापूसाहेब भेगडे यांना अद्यापी अधिकृत पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे बापूसाहेब भेगडे यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा गृहीत धरू नये, असा इशारा काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन अपक्ष म्हणून निवडून येऊन महायुतीला सरकार स्थापनेसाठी मदत करणार असतील, तर आम्ही बापूसाहेब भेगडे यांचे काम करणार नाही, असे काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आता उघडपणे बोलू लागले आहेत.
या सर्व राजकीय घडामोडींमुळे ‘सर्वपक्षीय’ उमेदवार म्हणून स्वतःला मतदारांपुढे प्रोजेक्ट करण्याचा बापूसाहेब भेगडे यांचा डाव त्यांच्याच अंगाशी आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मावळ तालुक्यात आमदार शेळके यांना वैयक्तिक मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या पाच वर्षात केलेले विकासकामे व लोकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क ही त्यांची सर्वात मोठी बलस्थाने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे. पक्षनिष्ठ असणारे भाजप व महायुतीचे नेते व कार्यकर्ते शेळके यांच्याच पाठीशी आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही महायुती धर्माचे पालन करण्याचे आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे आमदार शेळके यांना आव्हान देणे सोपे नाही, हे विरोधकांनाही मान्य करावे लागते.
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी थेट वाईटपणा घेणे राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते, या धास्तीने महायुतीचे काही नेते अस्वस्थ आहेत. ते बापूसाहेबांच्या व्यासपीठावर दिसत असले तरी प्रत्यक्षात सक्रिय झाल्याचे दिसून येत नाही.
बापूसाहेब भेगडे यांनी त्यांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली तरच आम्ही त्यांना मतदान करू, असे ठाम भूमिका भाजप बरोबरच महाविकास आघाडीच्या निष्ठावान मतदारांनी घेतली आहे. गेल्या पाच वर्षात मावळचा विकास झाला नाही आणि केवळ व्यक्ती द्वेष हे दोन मुद्दे बापूसाहेबांना मत देण्यासाठी पुरेसे नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. बापूसाहेब भेगडे व त्यांच्या मागे असलेले ‘चाणक्य’ द्विधा मनस्थितीत असलेल्या कार्यकर्ते व मतदारांचे शंका निरसन कशाप्रकारे करणार, या विषयी तालुक्यात उत्सुकता आहे.