आखातात युद्धाचा भडका! इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीय खलाशाचा मृत्यू, ८ जखमी

Indian Sailor Killed Hormuz Strait | अमेरिका आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षामुळे मध्यपूर्वेतील आखाती समुद्रात युद्धाची ठिणगी पडली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दोन तेलवाहू जहाजांवर (टँकर्स) भीषण क्रूझ क्षेपणास्त्र हल्ला केला. या क्षेपणास्त्र माऱ्यात जहाजावर कार्यरत असलेल्या एका भारतीय खलाशाचा (नाविक) दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य ६ भारतीयांसह ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर आखातातील परिस्थिती कमालीची संवेदनशील झाली असून जागतिक तेल पुरवठ्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर अधिकृत पोस्ट शेअर करत या हल्ल्याची माहिती दिली. यूएईचे ‘मोम्बासा’ (Mombasa) आणि ‘अल बहिया’ (Al Bahiya) हे दोन मोठे तेलवाहू टँकर्स ओमानच्या सागरी हद्दीतून, होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण मार्गाने जात असताना इराणने त्यांना लक्ष्य केले. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे दोन्ही जहाजांना भीषण आग लागली आणि मोठे नुकसान झाले. आपत्कालीन पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून जहाजांवरील आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मृत पावलेला भारतीय खलाशी ‘मोम्बासा’ टँकरवर तैनात होता.
जखमींमध्ये ६ भारतीयांचा समावेश; ४ जण गंभीर
या हल्ल्यात एकूण ८ नाविक जखमी झाले असून, त्यापैकी ६ जण भारतीय आणि २ युक्रेनचे नागरिक आहेत. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा
‘NCP’ त अंतर्गत कलह? सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवर आक्षेप
تعلن وزارة الدفاع عن تعرض الناقلتين الوطنيتين (ممباسا) و (الباهية) للاستهداف بصاروخين جوالين إيرانيين في الممر الجنوبي لمضيق هرمز بالمياه الإقليمية العمانية.
وقد أسفر الاستهداف عن مقتل أحد أفراد طاقم الناقلة (ممباسا) من الجنسية الهندية، وإصابة 8 من بينهم 4 إصابات بليغة. (6 من… pic.twitter.com/KVz3qDu6kf
— وزارة الدفاع |MOD UAE (@modgovae) July 13, 2026
“आम्ही प्रत्युत्तर देणार” – यूएईचा थेट इशारा
साधारणपणे आखातातील जहाजांवरील हल्ल्यांमागे कोणाचे नाव घेणे यूएई टाळते, परंतु यावेळी यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने थेट इराणवर आरोप केला आहे. हा हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांचे सरळ उल्लंघन असून प्रादेशिक शांतता धोक्यात आणणारा आहे, अशा शब्दांत त्यांनी निषेध नोंदवला. “संयुक्त अरब अमिरात कोणत्याही धोक्याचा सामना करण्यास सक्षम असून आपल्या सार्वभौमत्वाच्या आणि सुरक्षेच्या रक्षणासाठी योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवत आहोत,” असे यूएईने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
ओमान किनारपट्टीवर दुसऱ्या जहाजालाही धडक
दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘यूके मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स’ (UKMTO) एजन्सीनेही एक महत्त्वाची माहिती दिली. ओमानमधील कलहात बंदराच्या ईशान्येला सुमारे ४० सागरी मैलांवर एका अज्ञात वस्तूने (प्रोजेक्टाईल) दुसऱ्या एका जहाजाला धडक दिली. या धडकेत इंजिन रूमचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. हा हल्लाही इराणच्या लष्करानेच केला होता का, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा एकदा कडक लष्करी नाकेबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. जगातील एकूण २० टक्के तेल आणि गॅसची वाहतूक याच अरुंद मार्गातून होते. ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या तेलवाहू जहाजांना या भागातून सुरक्षित प्रवास हवा असल्यास, त्यांच्या एकूण कार्गोच्या मूल्यावर २० टक्के सुरक्षा शुल्क (प्रोटेक्शन फी) अमेरिकेला द्यावे लागेल. या अमेरिकेच्या भूमिकेमुळे आणि इराणच्या आक्रमकतेमुळे जागतिक बाजारात इंधनाचे दर गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





