Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

इथेनॉलचं एवढं समर्थन का? नितीन गडकरींनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले..

Nitin Gadkari | गेल्या काही दिवसांपासून देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून (E20) जोरदार चर्चा आणि वाद सुरू आहे. या पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी काही वाहनधारकांनी केल्या आहेत, तर केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या मुलाच्या म्हणजेच निखिल गडकरी यांच्या कंपनीच्या फायद्यासाठी इथेनॉलचा पुरस्कार करत असल्याचाही आरोप काही टीकाकारांनी केला होता. या सर्व आरोपांना आणि टीकेला नितीन गडकरी यांनी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या एका मुलाखतीत अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.

पेट्रोलियम मंत्रालय तुमच्याकडे नसतानाही तुम्ही इथेनॉलसाठी इतके आग्रही का? असा प्रश्न विचारला असता गडकरींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे गणित मांडले. ते म्हणाले, “या देशात दरवर्षी तब्बल २२ लाख कोटी रुपयांचे पेट्रोल-डिझेल आयात केले जाते. तसेच देशातील ४० टक्के वायू प्रदूषण याच पेट्रोलियम इंधनामुळे होते, ज्याचा दिल्लीसारख्या शहरांमधील नागरिकांच्या आरोग्यावर भयंकर परिणाम झाला आहे. हे २२ लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जाण्याऐवजी आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या खिशात जायला हवेत, हाच माझा उद्देश आहे.”

सरकारने मक्यापासून इथेनॉल बनवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन कसे बदलले, याचे उदाहरण त्यांनी दिले. गडकरी म्हणाले, “पूर्वी मक्याचा बाजारभाव १२०0 रुपये क्विंटल आणि हमीभाव (MSP) १८०० रुपये क्विंटल होता. मात्र, इथेनॉल निर्मिती सुरू झाल्यापासून मक्याचा दर थेट २६०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. इथेनॉलमुळे आज देशातील शेतकऱ्यांच्या खिशात अतिरिक्त २ लाख कोटी रुपये पोहोचले आहेत.”

हेही वाचा

“आईला संपव, तरच पत्नीला पाठवेन…”; सासूच्या सांगण्यावरून मुलानं जन्मदात्या आईला दिले विष

“मी मंत्री नव्हतो, २००४ पासून हेच सांगतोय”

मुलाच्या कंपनीला फायदा पोहोचवण्याच्या आरोपांवर बोलताना गडकरींनी स्पष्ट केले की, हा विचार नवा नाही. “मी २००४ साली मंत्रीही नव्हतो, तेव्हापासून स्वदेशी, स्वावलंबन आणि राष्ट्रवादाविषयी बोलत आहे. आपला देश इंधन क्षेत्रात स्वावलंबी व्हायला हवा. आपला शेतकरी फक्त अन्नदाता राहू नये, तर तो ‘ऊर्जादाता’ आणि ‘इंधनदाता’ बनून आपली गावे समृद्ध झाली पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे. मी केवळ इथेनॉल नाही, तर मिथेनॉल, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक गाड्यांसारख्या पर्यायी इंधनावर भर देण्याबाबत बोलतो,” असे त्यांनी नमूद केले.

आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत गडकरी शेवटी म्हणाले, “देशाला स्वावलंबी बनवणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळवून देणे आणि शहरांमधील प्रदूषण संपवणे या मूळ उद्देशांसाठी मी २००४ पासून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलत आहे. जर या देशहिताच्या मुद्द्यांवर बोलणे गुन्हा असेल, तर मग मी तो गुन्हा हसत-मुखाने करतो. हायड्रोजन मी स्वतः बनवत नाही, वीज माझ्या घरी तयार होत नाही आणि देशात याच्या ५५० हून अधिक कंपन्या आहेत. हा माझा कोणताही वैयक्तिक व्यवसाय नाही.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button