‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम: पुण्यात १२३ महिलांच्या तक्रारींचे निराकरण, अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती

पुणे : कालपासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा तीन दिवासांचा पुणे जिल्हा दौरा सुरू झाला असून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर विभागासाठी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.
या उपक्रमाचा हेतू असा होता की प्रत्येक महिलेला महिला आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्याने तिथे पोहचणे शक्य नसल्याने आयोग स्वत: पुणे जिल्ह्यामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून आला आहे. याचे कारण न्याय हा प्रत्येक महिलेला तिच्या दारी मिळायला हवा, हेच आमचे ध्येय असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. याविषयीची पोस्ट त्यांनी त्यांच्या एक्स या अकाउंटवरून शेअर केली आहे. या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याचे देखील त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
काल झालेल्या जनसुनावणीत १२३ तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. या तक्रारी प्रामुख्याने कौटुंबिक छळ, मालमत्ता व इतर गंभीर विषयांशी संबधित होत्या. या उपक्रमामुळे एकाच छताखाली पोलीस, प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थित असल्याने महिलांच्या तक्रारीवर त्वरीत निर्णय घेणे शक्य झाले.