मिशन विधानसभा: महायुतीच्या उमेदवारांचे काम करणार : आरपीआय नेते बाळासाहेब भागवत
पिंपरी रणसंग्राम: आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी पक्षाची यंत्रणा कामाला

पिंपरी : महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे असा आदेश आम्हाला वरिष्ठांकडून मिळालेला आहे. त्यानुसार आम्ही कामाला लागलो आहोत असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे पिंपरी चिंचवड येथील ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत यांनी सांगितले.
महायुतीकडून पिंपरी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांना संधी देण्यात आली आहे. अण्णा बनसोडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब भागवत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर उपस्थित होते.
यावेळी भागवत म्हणाले अण्णा बनसोडे हे आमच्यासाठी सर्वसमावेशक नेतृत्व आहे. त्यांच्या प्रचारासाठी आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. त्यांना पिंपरी मतदारसंघांमधून लाखाचे लीड मिळवून देण्याचा आमचा विश्वास आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडून आदेश प्राप्त झाला आहे त्यानुसार महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचे काम ठिकठिकाणी कार्यकर्ते करणार आहेत. पिंपरीत देखील कार्यकर्त्यांची एकजूट अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. दरम्यान या मतदारसंघातून माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, तसेच स्वप्निल सोनकांबळे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना माघार घेण्याबद्दल पक्षाने सांगितले आहे असे देखील भागवत यावेळी म्हणाले.