निवडणुकीसाठी ‘लाडक्या बहिणीं’चा राजकीय वापर करून घेतला; बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल

Bacchu Kadu | प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महाराष्ट्र सरकारवर शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर मदत, शेतमालाच्या वाढत्या किमती आणि शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच, लाडकी बहीण योजनेवरूनसुद्धा बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, राज्य सरकार आता सांगत आहे की, आमच्याकडे पैसे नाहीत. मात्र, निवडणुकीअगोदर तुम्ही लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकत्र पैसे दिले. जशा निवडणुका झाल्या तशा अर्ध्या लाडक्या बहिणी अपात्र केल्या. पैशाअभावी लाडका भाऊ प्रशिक्षणार्थी योजना ही बंद करुन टाकली. कारण हा फक्त निवडणुकीपुरता कार्यक्रम होता. हा मदत म्हणून कार्यक्रम नसून त्यांचा राजकीय वापर करून घेण्यासाठी होता.
हेही वाचा : ‘बाळासाहेब ठाकरे हा ‘ब्रँड’ होता, नुसते नाव लावल्याने ‘ब्रँड’ बनत नाही’; फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील की नाही हेच माहिती नाही. कारण प्रशासन ठेवून सगळा माल जमा करायचा आहे. ना नगरसेवक, ना जिल्हा परिषद सदस्य सगळे नियंत्रण एकाच ठिकाणाहून करायचे आहे. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालावा. ईव्हीएमदेखील भाजपच्या कार्यालयात ठेवा, लोक येतील बटन तुम्ही दाबा, असा टोला कडू यांनी लगावला, असं बच्चू कडू म्हणाले.
आता आम्हाला सांगतात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत. देशातील २०० उद्योगपतींचे तुम्ही १८ ते २४ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांचे ३० ते ४० हजार कोटी कर्ज माफ करायला काय हरकत आहे. आमचे सोयाबीन, तूर, धान पिकाला २० टक्के बोनस द्यायला पाहिजे, त्यासोबतच जीएसटीचा परतावा देणार असेही सांगितले होते, मात्र काहीच होत नाही. अतिवृष्टी झाली, त्यावर कोणी बोलायला तयार नाही. सोयाबीन ३ हजार ४०० रुपयांवर विकावे लागणार आहे, त्यावर सरकार बोलायला तयार नाही. १५ ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाली नाही, तर आम्ही सोयाबीन जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन टाकणार असल्याचा इशारा कडू यांनी दिला.





