‘बाळासाहेब ठाकरे हा ‘ब्रँड’ होता, नुसते नाव लावल्याने ‘ब्रँड’ बनत नाही’; फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका

मुंबई | कोणीही एकत्र आले तरी आमचा विजय थांबवू शकत नाही आणि आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाविजय संकल्प’ मेळाव्यात व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एक ‘ब्रँड’ होता, पण नुसते नाव लावल्याने तुम्ही ‘ब्रँड’ बनत नाही, अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर थोडक्यात हुकला. भाजपचे दोनच नगरसेवक कमी निवडून आले, तरी आम्ही गणित जमविले होते व भाजपचा महापौर निवडून आणणे शक्य होते. पण शिवसेनेचा महापौर हवा, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा असून ते निराश व नाराज असल्याचे एकनाथ शिंदे व मिलींद नार्वेकर यांनी मला दूरध्वनी करुन सांगितले होते. त्यामुळे आम्ही मन मोठे करुन त्यांच्या शिवसेनेला महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद दिले. पण ठाकरे यांनी २०१९ मध्ये सत्ता ओरबाडून घेतल्याने आम्ही २०२२ मध्ये गनिमी कावा केला आणि २०२४ मध्ये बहुमताने महायुतीचे सरकार राज्यात निवडून आणले.
हेही वाचा : आजी-माजी पाच आमदारांचा प्रभाग भोसरी गावठाण राजकीय ‘केंद्रबिंदू’
बेस्टची पतपेढीची साधी निवडणूक असल्याने ती कशाला पक्षाच्या नावावर लढवायची. पण आमच्या नेत्यांनी ठाकरेंच्या ब्रँडचा बँडबाजा वाजविला. बाळासाहेब ठाकरे हा एक ब्रँड होता, तुम्ही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ही मुंबई कोणाची आहे, हे मुंबईकरांनी २०१४,१९ व २४ च्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीने मराठी माणसाला मुंबईबाहेर घालविले. पण आमच्या सरकारने वरळीतील बीडीडी चाळीतील मराठी माणसाला ५४० चौ. फुटांची घरे देण्याचा निर्णय घेतला, धारावीत केवळ पात्रच नाही, तर अपात्र रहिवाशांनाही घरे देण्यात येणार आहेत. स्वयंविकासाचे १६०० प्रकल्प उभारले जात आहेत, ३५४ किमीचे मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. पण विरोधकांचे सरकार मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू, किनारपट्टी रस्ता आदी कोणतेही प्रकल्प पूर्ण करु शकले नाहीत. महायुतीच्या कार्यकाळात मुंबईचा विकास वेगाने होत असून आम्ही ‘कल्पनेतील मुंबई ’ (रीइमॅजिन) साकारत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.





