पार्थ पवार यांच्या पराभवापासून अजित पवार नाराज : संजय शिरसाट
राजकीय रस्सीखेचमध्ये मावळ लोकसभा केंद्रबिंदू : आगामी लोकसभा निवडणुकीचीही गणिते बदलणार
पुणे : “पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजित पवार नाराज आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना काही कामांसाठी उद्धव ठाकरे यांची भेट अजित पवार यांनी अनेकदा मागितली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट दिली नाही. आजही महाविकास आघाडीच्या सभांमध्ये अजित पवार यांचे स्थान शोधावे लागते, असा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
२०१९ मध्ये पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पार्थ यांचा पराभव झाला. त्यावेळी अजित पवार यांचा बालेकिल्ला पिंपरी-चिंचवड आणि मावळातून पार्थ विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यामाध्यमातून पार्थ यांचा पराभव झाला. त्यावेळीपासूनच ठाकरे आणि पवार घारण्यात काहीप्रमाणत मनभेद झाले होते.
दरम्यान, अजित पवार महायुतीसोबत आले तर त्यांचे स्वागतच करणार आहोत. अजित पवार स्वतःचा गट घेऊन आमच्यासोबत सत्तेत आले तर त्यांचे स्वागतच करू. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पाठिंबा देत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.
…तर पार्थ पवार मावळातून भाजपाचे उमेदवार?
विशेष म्हणजे, अजित पवार भाजपासोबत आपला गट घेवून गेले, तर आगामी लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार भाजपाच्या तिकीटावर मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील. शिवसेना खासदार (शिंदे गट) यांना पर्यायी मतदार संघ दिला जाईल. त्यामुळे अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेवर पिंपरी-चिंचवडचा खासदार कोण? हे निश्चित होणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.





