भारतीय फलंदाजांचा कस; ‘अव्वल आठ’ फेरीत आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

अहमदाबाद : साखळी फेरीतील आपले चारही सामने जिंकूनही भारतीय संघासमोर काही प्रश्न निर्माण झाले असून त्यांची उत्तरे शोधण्याचा आता त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे. याची सुरुवात ‘अव्वल आठ’ फेरीतील आज, रविवारी होणार्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने होईल. या वेळी सलामीवीर अभिषेक शर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांसह सर्वच भारतीय फलंदाजीचा कस लागणार आहे.
गतस्पर्धेत अंतिम फेरीत खेळलेले भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आता ‘अव्वल आठ’ फेरीतील पहिल्याच सामन्यात समोरासमोर येतील. हा सामना सव्वा लाख आसनक्षमता असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडे कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, मार्को यान्सन, केशव महाराज आणि एडीन मार्करम असे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल.
भारतीय संघाला साखळी फेरीत प्रतिस्पध्र्यांनी झुंज दिली, पण मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात भारताचे खेळाडू यशस्वी ठरले. असे असले तरी फलंदाजांना फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. सलामीवीर इशान किशन (दोन अर्धशतके आणि २०२ स्ट्राइक रेट) चांगल्या लयीत आहे. अन्य फलंदाजांना मात्र कामगिरी उंचवावी लागेल. अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला आहे. सूर्यकुमार व तिलक यांनी योगदान दिले आहे. मात्र, ज्या खेळपट्टीवर चेंडू थांबून येतो अशा ठिकाणी हे दोघे फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्या (स्ट्राइक रेट १५५) आणि शिवम दुबे (स्ट्राइक रेट १७८) दमदार कामगिरी करत आहेत. या दोन्ही अष्टपैलूंकडून संघाला अपेक्षा असतील. अभिषेक सलग दोनदा ऑफ-स्पिन गोलंदाजाविरुद्ध बाद झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करम ‘पॉवर-प्ले’मध्ये गोलंदाजीस येतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा – राहुल नार्वेकर विरोधकांचे लक्ष्य; विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून
जसप्रीत बुमरा आणि वरुण चक्रवर्ती यांची आठ षटके महत्त्वपूर्ण ठरतील. चक्रवर्तीने चार साखळी सामन्यांत नऊ बळी मिळवले आहेत. बुमराने जे तीन सामने खेळले, त्यामध्ये त्याने प्रभावी गोलंदाजी केली. अहमदाबादच्या संथ खेळपट्टीवर अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळू शकते.
डावखुर्या तिलकला साखळी फेरीत प्रभाव पाडता आला नाही. पाकिस्तानविरुद्ध २४ चेंडूंत २५ धावा, नामिबियाविरुद्ध २१ चेंडूंत २५ धावा आणि नेदरलँड्सविरुद्ध २७ चेंडूंत ३१ धावा अशी त्याची कामगिरी होती. मात्र, त्याला मोठी खेळी करता आलेली नाही, शिवाय खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर धावगतीही वाढवता आलेली नाही. सूर्यकुमारने सलामीच्या लढतीत अमेरिकेविरुद्ध ४९ चेंडूंत ८४ धावांची खेळी केली होती. मात्र, इतर सामन्यांमध्ये त्याने निराशा केली. त्यामुळे या दोघांना अधिक आक्रमकता दाखवावी लागेल.
अभिषेकची चिंता नाही – सूर्यकुमार अहमदाबाद : अभिषेक शर्मा ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आपल्या पहिल्या धावेच्या प्रतीक्षेत असला तरी, त्याच्या कामगिरीची आपल्याला चिंता नसल्याचे कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला. ‘‘मला अभिषेकच्या लयीची चिंता नाही. उलट त्याची चिंता करणार्यांचीच मला अधिक काळजी वाटते. गेल्या वर्षी अन्य खेळाडू अपयशी ठरत असताना अभिषेकने संघासाठी निर्णायक खेळी केल्या. आता त्याला संघाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि अशा गोष्टी घडत असतात,’’ असे सूर्यकुमारने सांगितले.




