मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ७५ हजार कर्मचाऱ्यांची फौज; प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास फौजदारी कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल ७५ हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यापैकी सुमारे ५८ हजार कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण २९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. निवडणूकविषयक कामाच्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मुंबई महापालिका अधिनियमातील कलम २८ (क) अन्वये फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अवघे २० दिवस उरले असून महापालिका प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यग्र आहे. मुंबई महापालिकेची व्याप्ती मोठी असून एकूण २२७ प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तब्बल १० हजाराहून अधिक मतदान केंद्रे असतील. विधानसभा निवडणुकीसाठी एकूण १० हजार १११ मतदान केंद्रे होती. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रामध्ये वाढ होणार असून एकूण ११ हजार १२२ मतदान केंद्रे तयार करावी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेला मोठ्या प्रमाणावर कर्मचारी लागणार आहेत.
निवडणुकीच्या कामासाठी एकूण ७५ हजार कर्मचारी लागणार असले तरी त्यापैकी सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांनाच सध्या निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. तर उर्वरित कर्मचारी मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी कार्यरत असतील. सुमारे ५८ हजार कर्मचाऱ्यांना आतापर्यंत आदेश देण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण २९ डिसेंबरपासून सुरू होत आहे. प्रशिक्षण सत्र सहा दिवस चालणार असून प्रत्येक दिवशी सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे कर्मचारी मतदानाच्या आदल्या व मतदानाच्या दिवशी कार्यरत राहतील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर ‘ही’ चूक करू नका
दरम्यान, निवडणुकीच्या कामासाठी नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांनी, विशेषतः शिक्षकांनी विरोध केला आहे. मात्र या कामासाठी विभाग कार्यालयातून प्रत्येकी ४० ते ४५ कर्मचारी मागवण्यात आले आहेत. तर मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागातून सुमारे १५ ते २० शिक्षक कर्मचारी घेण्यात आले आहेत. तर आरोग्य विभागातील फक्त लिपिकांना निवडणुकीच्या कर्तव्यासाठी घेण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीसाठी एकूण ७३०४ मतदान केंद्रे होती. त्यावेळी निवडणुकीच्या कामासाठी ४१ हजार ९८० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यात यंदा वाढ झाली आहे.
पालिका प्रशासनाने निवडणूक कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. तसेच हे आदेश रद्द करण्यासाठी किंवा फेरबदल करण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही सक्त आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास मुंबई महापालिका अधिनियमातील कलम २८ (क) अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.





