‘२०२९ मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार’; चंद्रकांत खैरेंची भविष्यवाणी

मुंबई | २०२९ मध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका होतील, आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार, असा मोठा दावा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. जालन्यात एका लग्न समारंभात भेट देण्यासाठी आलेले असतांना खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २०२९ साली भाजपचे अधःपतन होऊन, शिवसेना सत्तेत येणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
चंद्रकांत खैरे म्हणाले, की रावसाहेब दानवे हे विचित्र माणूस आहेत. आता म्हणतात आम्ही काँग्रेससोबत गेलो, उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले. पण बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना, उद्धव ठाकरे आता पुढे घेऊन जात आहेत. आमच्यासारख्या कडवट शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे जोमाने काम करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी आमच्या काही लोकांना पैसे वाटले. त्यांच्या पक्षातीलही काही जणांना पैसे वाटले आणि माझा पराभव केला. हाच तुमचा प्रामाणिकपणा आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : ‘९ टक्के हिंदू एकत्र आले तरीही रामराज्य स्थापन होईल’; मिथुन चक्रवर्तींचं वक्तव्य
मी अजूनही त्या माणसाचे तोंड पाहिलेले नाही. मी त्या माणसाशी बोलतही नाही. त्यांनी युतीचा खासदार पाडला. आता परमेश्वराने या निवडणुकीत त्यांना दाखवून दिले. बदला निघतो, बदला थांबत नाही. भाजपाच्या पक्ष शिस्तीत एका घरात एकच तिकीट आहे. पण यांनी दोन तिकिटे पदरात पाडून घेतील. शिंदे गटातून मुलीला उभे केले असेल, तरी त्यांची युतीच आहे ना. परंतु, आता पुढे शिवसेनाच त्या ठिकाणी येणार आहे. तुम्ही २०२९ च्या निवडणुकीत काय होते ते पाहा. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वखाली त्या निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री बनतील, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.
सरकार येते आणि जाते. अमेरिकेत ट्रम्प कसे वागत आहेत, तिथे त्यांच्याविरोधात तेथील सर्व राज्यातील लोक रस्त्यावर उतरली आहेत. इथेही तेच होणार आहे. असेच वागत राहिले तर अधःपतन नक्की होणार आहे. भीमाचे गर्वहरण हनुमंतांनी केले, तर हे लोक कोण आहेत. भाजपाचे स्थानिक मंत्री दानवेंना विचारत नाहीत. बळजबरीने त्यांनी घुसखोरी केली आहे. बाकी काही त्यांचे आता राहिलेले नाही, अशी टीकाही चंद्रकांत खैरे यांनी केली.