अभिनेता सलमान खानच्या इमारतीत शिरलेला संशयीत तरूण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या इमारतीत शिरलेल्या तरूणाला पोलिसानी ताब्यात घेतले. सुरक्षा रक्षक व पोलिसांची नजर चुकवून आरोपी इमारतीत शिरला होता. आरोपी तरूण छत्तीसगडमधील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.
अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञात तरूणाने प्रवेश केल्यामुळे एकच खळबळ उडाली. हा प्रकार मंगळवारी रात्री घडला. आरोपी तरूण पोलिसांची नजर चुकवून मोटरगाडीच्या मागे लपला. त्यामुळे तरूणाला सलमान खानाच्या इमारतीत प्रवेश करण्यात यश आले. पण हा प्रकार तात्काळ पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी संशयीत तरूणाला ताब्यात घेतले. जितेंद्रकुमार सिंह असे या तरूणाचे नाव असून तो छत्तीसगडमधील रहिवासी आहे. इमारतीत प्रवेश करण्याच्या काही तास आधी जितेंद्रकुमार सिंहला गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर फिरताना पोलिसांनी हटकले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३२९ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा तपास करीत आहे.
हेही वाचा – ‘वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा दुरान्वये संबंध नाही’; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
यापूर्वीही सलमान खानला मारण्याची धमकी दिल्याचा संदेश वाहतूक पोलिसांना आला होता. त्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. ‘मी लॉरेन्सचा भाऊ बोलत आहे, सलमानला जिवंत रहायचे असेल, तर त्याला आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल. पाच कोटी रुपये द्यावे लागतील. तसे न केल्यास सलमानला जिवंत सोडणार नाही. आमची टोळी आजही सक्रीय आहे’, असे संदेशात धमकवण्यात आले होते. याप्रकरणी वरळी पोलीस तपास करीत आहेत. यापूर्वीही, सलमानला मारण्याची धमकी मिळाली आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअप क्रमांकावर गेल्या वर्षी संदेश प्राप्त झाला होता व आरोपीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी तत्काळ वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. तेव्हा धमकी देणारी व्यक्ती वांद्रे (प.) येथील जामा मशिदीजवळ असल्याचे कळताच तेथे जाऊन पोलिसांनी आजम मोहम्मद मुस्तफाला पकडले होते. तसेच सलमानला आणखी एक धमकी आली होती. सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय भाजी विक्रेत्याला वरळी पोलिसांनी अटक केली होती. यापूर्वी सलमानच्या घरी लॉरेन्स बिष्णोई टोळीने गोळीबार केला होता. त्याप्रकरणी गुन्हे शाखेने मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.