पिंपरीतील १८४ सोसायट्यांचा पाणीपुरवठा एक जूनपासून खंडित
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरहून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्याबाबत तीनवेळा नोटिसा देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या १८४ सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १ जूनपासून एसटीपी कार्यान्वित नसलेल्या सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूने विस्तारत असून लाेकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरत नाही. सद्य:स्थितीत शहरवासीयांना ६२० ते ६३० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी एका दिवसाला दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील अनेक मोठ्या साेसायट्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
एकत्रित बांधकाम व विकास नियमावलीनुसार (यूडीसीपीआर) वीस हजार चौरस मीटरपुढील क्षेत्रफळावरील, शंभर सदनिका आणि दररोज वीस हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या गृहनिर्माण सोसाट्यांना पाण्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ४५६ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यांपैकी २६४ सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित आहेत. ‘एसटीपी’ सुरू करण्याचे आवाहन करूनही १८४ साेसायट्यांमधील ‘एसटीपी’ विविध कारणांनी बंद आहेत. त्याकडे सोसायट्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने एक जूनपासून आता पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : पालखी मार्गावरील अडथळे दूर करा; पुणे महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
दरम्यान, एसटीपी कार्यान्वित ठेवण्याचा खर्च परवडत नाही. देखभाल दुरुस्तीसाठी महिन्याला ४० हजार रुपयांचा खर्च येतो. बांधकाम व्यावसायिक एसटीपी व्यवस्थित बांधून देत नाहीत. महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी सोसायटीधारकांची भूमिका आहे.
ह्या ज्या 184 सोसायट्या आहेत त्यांचे एसटीपी हे अतिशय निकृष्ट दर्जाचे बसवलेले आहेत.बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यावेळी काहीही चेक न करता महानगरपालिकेने या बांधकामव्यासायिक यांना पाठिशी घालून हे बांधकामपूर्णत्वाचे दाखले दिलेले आहेत. अगोदर या बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) तसेच एसटीपी व्यवस्थित बसवलेला नसताना व तो बंद अवस्थेत असताना देखील बांधकामपूर्णत्वाचे दाखले व ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या पर्यावरण व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी नंतर आमचे पाण्याचे कनेक्शन कट करावे.या सर्व मोहिमेस आमच्या फेडरेशनचा तीव्र विरोध असेल आम्ही हे होऊ देणार नाहीत.आधीच निष्क्रिय पाणीपुरवठा विभाग त्यात ही कारवाई आम्हाला मान्य नाही याला लोकशाही मार्गाने तीव्र विरोध केला जाईल
– संजीवन सांगळे, अध्यक्ष- चिखली मोशी पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन.
बांधकाम व्यावसायिक एसटीपी व्यवस्थित बांधून देत नाहीत. महापालिकेचे एसटीपी सुस्थितीत आहेत का? याची तपासणी करावी. पाणी बंद करणे पर्याय नाही. पाणी मूलभूत गरज आहे. मुळातच महापालिका पुरेसे पाणी देत नाही. सोसायट्यांना टँकरवर तहान भागवावी लागत आहे.
– दत्तात्रय देशमुख, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड को-ऑप. हौसिंग सोसायटी फेडरेशन.
‘एसटीपी’ कार्यान्वित करण्याची जबाबदारी सोसायट्यांची आहे. त्यासाठी कालावधीही देण्यात आला. त्यानंतरही एसटीपी कार्यान्वित केले नाहीत. त्यामुळे १ जूनपासून नळजोड तोडले जाणार आहेत.
– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.