स्वच्छ सुंदर सातारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणार जिल्हा परिषदेतर्फे अभिनव उपक्रम; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची संकल्पना

Satara : सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन विकास निधीतून पहिल्यांदाच ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सातारा जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे ग्रामीण भागातील सुक्या कचऱ्याचे, प्लास्टिक, इ. न कुजणारा कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्याने स्वच्छतेच्या बाबतीत सन २००१ साला पासून मोठी भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील उघड्यावर हागणदारीचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शंभर टक्के लोकांच्याकडे वैपक्तिक शौचालयाची सुविधा निर्माण झाली असून त्या सुविधेचा वापर ग्रामीण भागातील लोक करताना दिसत आहेत, यामुळे आरोग्यमान सुधारले आहे. सध्या उघड्यावरील शौचविधीचा प्रश्न निकाली निघाला असला तरी सुद्धा उघड्यावर पडणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याची मोठी समस्या जिल्ह्यात भासत आहे. प्रत्येक गावाच्या सुरुवातीला गावाच्या कडेला रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या कचरा पडलेला दिसत असून गावाचे ओंगळवाणी रूप दिसत आहे.
हेही वाचा – ‘आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा जिल्ह्यात प्लास्टिक कचरा निर्मूलन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने जुलैमध्ये झालेल्या बैठकीस संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व सर्व तालुक्याचे गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका, परिषदांचे मुख्याधिकारी तसेच सर्व संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे प्लॅस्टिक, कागद, काच, धातू आणि इतर पुनर्वापर योग्य साहित्याचे वर्गीकरण व पुनर्निर्मिती उद्योगांपर्यंत पोहोचवणे सुलभ होईल. हा प्रकल्प स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून, यामुळे ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी सुविधा मिळणार आहेत तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती आणि जनजागृती वाढेल.
सदरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (सुका कचरा विलगीकरण व व्यवस्थापन आणि ओला कचरा पासुन बायोडायजेस्टरच्या सहाय्याने खत निर्मिती) या करिता स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ आणि जिल्हा नियोजन विकास समिती मार्फत प्रस्तावीत निधी यांच्या अभिसरणाव्दारे प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून प्रकल्पासाठी आवश्यक निधी प्रस्तावित केला जाणार आहे .




