मोहननगर जलतरण तलाव ठेकेदारीला विरोध!
महापालिकेनेच चालवावा : मारुती भापकर यांची मागणी

पिंपरी-चिंचवड : मोहननगर येथील छत्रपती राजश्री शाहू महाराज जलतरण तलावासह शहरातील जलतरण तलाव ठेकेदारी पद्धतीने चालवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध व्यक्त करत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी हे तलाव महापालिकेनेच “ना नफा ना तोटा” तत्त्वावर चालवावेत, अशी ठाम मागणी केली आहे.
शहरातील सुमारे १० जलतरण तलाव सन २०१६-१७ मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खोली कमी करण्यासाठी बंद करण्यात आले होते. मोहननगर येथील राजश्री शाहू महाराज जलतरण तलाव तब्बल आठ-नऊ वर्षे बंद राहिल्याने नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकला नाही. या पार्श्वभूमीवर भापकर यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून २०२३-२४ मध्ये सुमारे ३ कोटी ९१ लाख रुपयांच्या नूतनीकरण कामासाठी निविदा काढण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
या जलतरण तलावाची उभारणी कै. नेताजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून झाली होती. पूर्वी हे तलाव महापालिकेमार्फत सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, महिला व ज्येष्ठ नागरिकांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून दिले जात होते. मात्र, आता ठेकेदारी पद्धतीमुळे दरवाढ होऊन नागरिकांच्या खिशावर आर्थिक ताण पडण्याची शक्यता भापकर यांनी व्यक्त केली आहे.
नव्याने निवडून आलेले क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर व अंकिता लंगोटे यांनी या विषयात ठाम भूमिका घेत महापालिकेनेच तलाव चालवण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – नामदार शिवेंद्रराजेंकडून जावळीला झुकते माप!
भापकर यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळातील (२००७-२०१२) अनुभवाचा दाखला देत, मोहननगर येथील राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन बीओटी तत्त्वावर उभारण्याचा निर्णय जनतेच्या विरोधामुळे रद्द करून तो प्रकल्प महापालिकेमार्फत पूर्ण करण्यात आला होता, अशी आठवण करून दिली. “त्यावेळी नागरिकांचा जनादेश मान्य करून ठेकेदारी रोखली होती; त्याच धर्तीवर आजही निर्णय व्हावा,” असे ते म्हणाले.
दरम्यान, आज (दि. १८ एप्रिल) या जलतरण तलावाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन महापौर रवी लांडगे, आयुक्त विजय सूर्यवंशी व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमातच ठेकेदारीचा निर्णय रद्द करून तलाव महापालिकेमार्फतच चालवण्याची घोषणा करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे. “करदात्या नागरिकांच्या पैशातून उभारलेली सुविधा पुन्हा ठेकेदारांच्या घशात घालू नये,” असा ठाम इशारा देत परिसरातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“करदात्या नागरिकांच्या पैशातून उभारलेले जलतरण तलाव ठेकेदारांच्या हवाली करणे अन्यायकारक आहे. हे तलाव पूर्वीप्रमाणेच ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर महापालिकेनेच चालवले, तरच सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना परवडणाऱ्या दरात सुविधा मिळतील. अन्यथा हा निर्णय नागरिकांच्या खिशावर अन्याय करणारा ठरेल.”
— मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते.





