बुधवारपर्यंत करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; ट्रम्प यांचा इराणला इशारा

Donald Trump | अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. येत्या बुधवारपर्यंत करार झाला नाही, तर सध्याचा युद्धविराम संपुष्टात येऊ शकतो आणि पुन्हा लष्करी कारवाई सुरू होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सूचित केले.
फिनिक्स, ॲरिझोना येथून वॉशिंग्टनकडे एअर फोर्स वन विमानाने परतताना पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली. “कदाचित युद्धविराम वाढवला जाणार नाही. नाकेबंदी कायम राहील आणि परिस्थिती तशीच राहिली, तर पुन्हा बॉम्बहल्ले करावे लागू शकतात,” असे त्यांनी सांगितले.
अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक प्रयत्न अद्याप ठप्प आहेत. पाकिस्तानमध्ये झालेल्या अप्रत्यक्ष चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. निर्बंधांमधून सवलत, अण्वस्त्र कार्यक्रमाबाबतची बांधिलकी आणि सागरी सुरक्षेचे मुद्दे हे वादाचे मुख्य केंद्रबिंदू ठरले आहेत. दोन्ही देशांमध्ये बॅकचॅनल चर्चेद्वारे तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी मतभेद कायम असल्याने युद्धविरामाचा भवितव्य अनिश्चित मानले जात आहे.
हेही वाचा : महिला आरक्षण विधेयक नामांजूर होताच फडणविसांची विरोधकांवर टीका, रस्त्यावर उतरण्याच्या इशारा
‘होर्मुझ सामुद्रधुनी’वर वाढता तणाव
जगातील सुमारे २० टक्के तेल आणि एलएनजी वाहतूक होणारी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ ही जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या मार्गावरील तणाव वाढल्यास जागतिक बाजारपेठ आणि तेलदरांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टनने हा जलमार्ग सुरक्षित असल्याचा दावा केला असला, तरी अमेरिकेचा दबाव वाढल्यास वाहतूक रोखण्याचा इशारा तेहरानकडून देण्यात आला आहे.
इराणी बंदरांवर अमेरिकेची नाकेबंदी कायम
एप्रिलच्या मध्यापासून अमेरिकेने इराणी बंदरांवर नौदलाची नाकेबंदी लागू केली आहे. या कारवाईअंतर्गत इराणशी संबंधित जहाजांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. इराणने मात्र ही नाकेबंदी बेकायदेशीर आणि चिथावणीखोर असल्याचा आरोप करत तीव्र निषेध नोंदवला आहे.





