#UnclogHinjawadiITPark Movement: हिंजवडीतील अपघातांमुळे संतप्त IT कर्मचाऱ्यांचा एल्गार!
दोन महिन्यांत चार बळी; वाहतूक पोलीस पैसे वसूल करण्यात व्यस्त, महिलांचा संताप उसळला

पिंपरी-चिंचवड | हिंजवडी आयटी परिसरातील वाहतूक विस्कळीत व्यवस्था, खड्डेमय रस्ते आणि अवजड वाहनांच्या निष्काळजी वाहतुकीमुळे दोन महिन्यांत चार नागरिकांचा जीव गेल्याने संतप्त आयटी कर्मचाऱ्यांनी आता रस्त्यावर उतरायचा निर्णय घेतला आहे. दिवाळीनंतर पीएमआरडीए कार्यालयावर मोठा मोर्चा नेण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
भारती मिश्रा या महिलेचा नुकताच सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या कँडल मार्चला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. “हा फक्त ट्रेलर आहे, मुख्य लढा अजून बाकी आहे,” अशा शब्दांत आंदोलकांनी प्रशासनाला इशारा दिला.

“वाहतूक पोलीस हेल्मेट, सीटबेल्ट आणि पार्किंगच्या नावाखाली फक्त पैसे वसूल करण्यात गुंतले आहेत. रस्त्यावर मोकाटपणे धावणाऱ्या मिक्सर, टँकर, डंपर यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हे अपघातांना निमंत्रण देणं नाही का?” असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. जुलै 2025 मध्ये झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्यात रस्ते सुधारण्याचे आश्वासन दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सहा वाजता प्रत्यक्ष दौरा केला. मात्र, तीन महिने उलटल्यानंतरही परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. “प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे. प्रत्यक्षात रस्त्यांवरील खड्डे आणि नागरिकांचे जीव अद्यापही धोक्यात आहेत,” असं सचिन लोंढे यांनी ठणकावून सांगितलं.
हेही वाचा : पुण्यातील जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
महिला IT कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला
रोजच्या प्रवासात अपघाताचा धोका ओढवतोय. “कामावर गेलो की घरी परत येऊ की नाही, ही शंका वाटते,” अशा भावना अनेक महिला IT कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. रस्त्यांवरील असुरक्षितता, वाहनांच्या वेगावर कोणतीही मर्यादा नसणे, आणि अपघातानंतरचा प्रशासनाचा हलगर्जीपणा – या सर्व गोष्टींमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे.अपघातग्रस्तांच्या न्यायासाठी केवळ वाहनचालकांवर नव्हे, तर त्या वाहनांचे मालक आणि संबंधित बांधकाम कंपन्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. “गेल्या दोन महिन्यांत चार बळी गेलेत. रस्ते खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहेत. महिला दिवसाढवळ्या जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. डंपर चालक अटकेत गेला म्हणजे न्याय मिळाला, असा समज करायचा नाही – त्यामागे असलेले मालकही जबाबदार आहेत,”
जुलै- 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विधानभवन येथे हिंजवडी वाहतूक समस्यांबाबत बैठक झाली. त्यावेळी एका महिन्यात रस्ते दुरूस्त करुन देतो असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे 6 वाजता दौरे केले. मात्र, तीन महिन्यानंतरही काही फरक पडला नाही. उलट रस्ते पूर्वीपेक्षा बिकट झाले आहेत. पीएमआरडीए प्रशासनाला अल्टिमेटम देत आहोत. दिवाळीनंतर मोठा मोर्चा आम्ही प्राधिकरणावर काढणार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही. सर्व निमुळते रस्ते हे मृत्यूचा सापळा बनले आहेत. महिला नागरिक जीव मुठीत धरुन प्रवास करीत आहेत. एक महिलेचा जीव जातो तेव्हा एक कुटुंब उद्धस्थ होते. याला प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहेत. आता फक्त ट्रेलर आहे. आम्हाला हलक्यात घेवू नका. आयटी कर्मचाऱ्यांनी ठरवले तर मतदान बहिष्कार पासून रस्त्यावर उतरण्यापर्यंत सर्व करु शकतो. – सचिन लोंढे, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.
– सचिन लोंढे, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.





