विद्यार्थ्यांनी जाणून घेतले नवीन फौजदारी कायदे
शिक्षण विश्व: न्यू मिलेनियम ज्युनियर कॉलेजमध्ये नवीन फौजदारी कायद्यांवर विशेष प्रशिक्षण

पिंपरी-चिंचवड | नवीन फौजदारी कायद्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढावी त्यांना कायदेविषयक आकलन व्हावे या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातले प्रश्न तज्ञांच्या उत्तरातून जाणून घेतले.
पिंपळे गुरव येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे नवीन फौजदारी कायद्यांवरील विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून ॲड.मंगेश खराबे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंकुश बांगर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती इनायत मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सत्रात ॲड. मंगेश खराबे यांनी भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यातील महत्त्वाचे बदल समजावून सांगितले. या कायद्यान्वये 2023 मध्ये बालकांच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या. अठरा वर्षाखालील तसेच अठरा वर्षावरील मुलांच्या कायद्याबाबतचे बारकावे यावेळी सांगण्यात आले. महाविद्यालयीन मुलांना सोशल मीडिया वापराविषयी मार्गदर्शन करताना ऑनलाइन फसवणूक, सायबर बुलिंग, हॅकिंग यासारख्या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या उपाययोजनांवर माहिती सांगण्यात आली. पास्को कायद्याची माहिती देत “गुड टच – बॅड टच” ओळखणे आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय समजावण्यात आले.
हेही वाचा : वाकडच्या विकासासाठी आता “आमदार आपल्या दारी”
वाहतूक सुरक्षा आणि जबाबदारी वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. हेल्मेट व सीट बेल्टच्या वापराचे महत्त्व, झेब्रा क्रॉसिंग व सिग्नलच्या पालनाची गरज तसेच अल्पवयीन वाहन चालवण्याचे कायदेशीर परिणाम विद्यार्थ्यांना समजावण्यात आले. जबाबदार नागरिकत्व आणि सामाजिक भान विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, आपत्ती व्यवस्थापन, प्राथमिक उपचार आणि सामाजिक जबाबदारी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कायदे, नियम आणि शिस्त पाळण्याची सवय लावणे, पोलिसांशी संवाद साधण्याचे महत्त्व आणि समाजासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सांगवी वाहतूक विभागाच्या वतीने ॲड.मंगेश खराबे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियम पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.