दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला; आज उर्वरित राज्यात मान्सूनचा प्रवेश

मुंबई : राज्यात दोन आठवड्यांची विश्रांती घेऊन एकाच जागी स्थिर असणाऱ्या मान्सूनने सोमवारपासून पुन्हा वाटचाल सुरु केली आणि बुधवारपर्यंत, अवघ्या दोन दिवसात संपूर्ण राज्य व्यापून गुजरात आणि मध्यप्रदेशच्या काही भागांपर्यंत वाटचाल केली आहे, अशी माहिती बुधवारी हवामान विभागाने दिली. त्यामुळे आता संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे. सध्या राज्यात बहुतांश भागात वादळी पावसाची तर काही भागात मुसळधार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे राज्यवासियांना तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळत आहे.
मान्सूनने तळकोकणात प्रवेश केल्यानंतर पुढील दोन दिवसात हर्णे आणि सोलापूरपर्यंत प्रवास केला होता. मात्र, त्यांनतर त्याची राज्यातील वाटचाल दोन आठवडे एकाच जागी स्थिर होती. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सोमवारपासून मान्सून पुढे सरकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्याचा आधीचा वेग पाहता तो हळूहळू वाटचाल करेल अशी शक्यता होती.
मात्र, हवामान स्थिती अनुकूल असल्याने मान्सूनने वेगात वाटचाल करून अवघ्या दोन दिवसात संपूर्ण राज्य व्यापले आहे. तसेच मागील चोवीस तासात कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागाला पावसाने झोडपले आहे. काही भागात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली असून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे जूनच्या पंधरवडा कोरडा गेल्यानंतर राज्यात आता चांगल्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी मान्सूनने २६ मे रोजी मुंबईत प्रवेश केला होता. त्यानंतर काही काळ त्याची उत्तर सीमा एकाच जागी स्थिर होती. साधारणपणे १५ जूनला मान्सून हळूहळू पुढे सरकला होता. मान्सूनने संपूर्ण राज्य १७ जूनला व्यापले होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेने मान्सूनने यंदा ७ दिवस उशिराने संपूर्ण राज्या व्यापले आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात १ जून ते २३ जूनपर्यंत सरासरी पावसाच्या ७२ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील काही भागात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी मुसळधार पावसाची नोंद झाली असून गुरुवारीही काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.





